महाराष्ट्र एनसीसी चमूचे यश गौरवास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूने पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र संचालनालयाने सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेनेच्या या यशासाठी आयोजित कौतुक सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.अदिती तटकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी, प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पंतप्रधान बॅनर सुपूर्द करण्यात आला, तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एनसीसीच्या चमूने नवी दिल्ली येथील संचलनात उत्कृष्ट कामगिरी करून पंतप्रधान ध्वज मिळवून  महाराष्ट्राची शान वाढवली. महाराष्ट्राचा प्रत्येक युवक हे यश पाहून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सहभागी होईल.

महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाचा वारसा आहे.  दिल्ली येथील थंडी आणि पावसाच्या वातावरणातही राज्याच्या या युवकांनी खडतर परिश्रम करुन यश प्राप्त केलेले आहे. भविष्यात यापुढेही असेच यश मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.पवार यांनी एनसीसी चमूचे अभिनंदन केले. एनसीसीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील. पोलीस भरतीमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना अधिकचे गुण देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले, महाराष्ट्राच्या युवकांनी दिल्लीत मानसन्मान मिळवला ही कौतुकास्पद बाब आहे. युवकांमध्ये एनसीसीच्या माध्यमातून शिस्त निर्माण होते. यामुळे राज्यात जास्तीत जास्त एनसीसी विद्यार्थी घडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. पोलीस भरतीमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, देशामध्ये सर्वोत्कृष्ट एनसीसी विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले, ते यश मिळवणे खडतर आहे. एनसीसी प्रशिक्षण साधारण नाही. एनसीसी झालेले विद्यार्थी  आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतात यात मुळीच शंका नाही. ॲड.ठाकूर यांनी चमूचे अभिनंदन केले आणि भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी राणे यांनी केले तर आभार मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!