महाराष्ट्र एनसीसी पथकाचे यश गौरवास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने केलेली कामगिरी दिमाखदार आणि गौरवास्पद असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिष्यवृत्ती निधी १८ लाख रुपयांवरुन १ कोटी रुपये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृहात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात  सहभागी झालेल्या १२५ एनसीसी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कर्नल निलेश पाथरकर, ब्रिगेडिअर लाहेरी, राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी, प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रधानमंत्री बॅनर सुपूर्द करण्यात आला, तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, एनसीसीच्या पथकाने नवी दिल्ली येथील संचलनात उत्कृष्ट कामगिरी करून पंतप्रधान ध्वज मिळवून  महाराष्ट्राची शान वाढवली. महाराष्ट्राचा प्रत्येक युवक हे यश पाहून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सहभागी होईल.

महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य आहे आणि प्रगत राहील. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, कुशल प्रशासक अशा राजाचा वारसा लाभला आहे. राज्याच्या या युवकांनी कठोर परिश्रम करुन यश प्राप्त केलेले आहे. त्याना उत्कृष्ट प्रशिक्षण देवून मार्गदर्शन करणारे अधिकारी लाभले असल्याने हे यश सुकर झाले.भविष्यात यापुढेही असेच यश मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.शिंदे यांनी एनसीसी छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.

एनसीसीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील. भविष्यात ही अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी व्यास यांनी केले, तर आभार मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!