महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नव्याने विकसित संकेतस्थळाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनावरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नव्याने विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे अनावरण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. हे संकेतस्थळ सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता अजय सिंह आणि भारत वानखेडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपाली देशपांडे – सावेडकर, संचालक (वित्त) राजेंद्र मडके,  सतीश माने, मृणाल शेलार, ग्रँट थोर्टन कंपनीचे माहिती तंत्रज्ञान सल्लागार विजय बेलूलकर, संकेतस्थळ विकासक सेंटम टेक्नॉलॉजीजचे गुरुप्रसाद कामत यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ही राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण १९६ कार्यालये आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सन २०१५ मध्ये संकेतस्थळ विकसित केले होते. ते सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यरत होते. त्यात आता नव्याने बदल करून हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. ई-गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मचा विकास आणि अंमलबजावणी करणे, माहिती, दळण-वळण आणि तंत्रज्ञान (ICT) लागू करून प्रशासकीय प्रक्रियेचे बळकटीकरण करणे यासाठी मजीप्राच्या आयटीसेल कडून विविध केंद्रीकृत सॉफ्टवेअरचा विकास करण्यात आला.

हे सॉफ्टवेअर मजीप्रामधील कार्यरत अधिकारी/ कर्मचाऱ्यांना वापरणे सुलभ जावे यासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर वापरण्याची संधी देण्यासाठी तसेच आयटी क्षेत्रामध्ये झालेल्या बदलास अनुसरून नव्याने हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. नव्याने विकसित केलेल्या संकेतस्थळामध्ये पाणी व्यवस्थापन प्रणाली, केंद्रीकृत प्रकल्प देखरेख प्रणाली, टॅली, ई-एमबी, ई-बिलींग, सेवार्थ, टपाल व्यवस्थापन इत्यादी सॉफ्टवेअर मजीप्रामधील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना सुलभपणे वापरता येणार आहेत. मजीप्रा मधील विविध विभागाची संक्षिप्त माहिती यामध्ये देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!