स्थैर्य, मुंबई, दि.४: महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग, पुणे विभाग आणि नागपूर विभाग पदवीधर या तीन मतदारसंघांसाठी तसेच अमरावती विभाग आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीचे वृत्तसंकलन व छायाचित्रण करण्यासाठी मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राधिकारपत्रे देण्यात येणार असून त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने केले आहे.
या निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून दि. 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.
प्राधिकारपत्रांसाठी इच्छुक वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे दि. 17 नोव्हेंबर, 2020 पर्यंत तपशील व संपादकांच्या शिफारशींसह अर्ज पाठवावा. अर्जासोबत पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे जोडावीत. एकाच व्यक्तीला मतदान तसेच मतमोजणी अशा दोन्ही केंद्रामध्ये प्रवेश हवा असल्यास, अशा व्यक्तींची तीन छायाचित्रे देणे आवश्यक राहील. छायाचित्रांच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती स्वीकारल्या जाणार नाहीत. विहित दिनांक व वेळेपूर्वीच आपले अर्ज द्यावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे सादर करावेत.