दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२३ । मुंबई । मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र सातत्याने उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. सध्या भारताची ओळख विकसनशील देश म्हणून होत आहे.पण येणाऱ्या २५ वर्षात भारत विकसित देश म्हणून ओळखला जाईल असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगट सध्या मुंबईत आहे. आज या कार्यगटासाठी वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्डस् एन्ड येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल यावेळी म्हणाले की, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे पायाभूत सुविधा निर्माण करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रात व्यापार आणि गुंतवणुकीला पोषक असे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याने गुंतवणूकदारांचे प्रथम पसंतीचे राज्य ठरेल असा विश्वास वाटतो.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. गोयल म्हणाले की, भारताला जी २० परिषद आयोजित करण्याची संधी मिळणे ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. ट्रेड, टेक्नोलॉजी, टैलेंट, ट्रेडिशन आणि ट्रस्ट याच्या जोरावर भारत येणाऱ्या २५ वर्षात उत्तुंग कामगिरी करेल.
या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात शिववंदनापासून झाली. लावणी, ओडिसी/भरतनाट्यम् आणि कथ्थकवर आधारित नृत्य, पालखी नृत्य, धनगर नृत्य, सनई नृत्य, गोंधळी नृत्य, ढोल, लेझीम यावेळी सादर करण्यात आले.
जी – 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठका मंगळवार दि. 28 ते गुरुवार 30 मार्च 2023 दरम्यान मुंबईत होत आहेत. या तीन दिवसीय बैठकीत जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याविषयक चर्चेत, जी-20 सदस्य गटांचे 100 हून अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, प्रादेशिक समूहांचे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देताना उद्भवणारी आव्हाने आणि मानव-केंद्रित ठोस निष्कर्ष आणि धोरणे आखण्यासाठी विद्यमान संधींचा कसा उपयोग करता येऊ शकतो याबाबत सामायिक समज निर्माण करणे हे भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे उद्दिष्ट आहे. मुंबई नंतर केवडीया, बंगळूर, जयपूर आणि दिल्ली येथे देखील या कार्यगटाच्या बैठका होणार आहेत.