
स्थैर्य, औरंगाबाद, दि.८: राज्यातील प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आता मार्च महिन्यात हाेण्याचे चित्र आहे. या स्पर्धेच्या आयाेजनाला महाराष्ट्र शासनाने लेखी स्वरूपातील परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी काेराेनाच्या बाबतीत सुरक्षेसाठी असलेल्या सर्व नियमावलीचे पालन करणे सक्तीचे असेल. यातूनच या स्पर्धा आयाेजनाचाा मार्ग आता माेकळा झाला आहे. त्यामुळे स्पर्धा यंदा फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आयाेजित करण्याचा कुस्ती परिषदेचा मानस आहे. यावर लवकरच शिक्कामाेर्तब हाेईल. काेराेनाच्या महामारीमुळे नाेव्हेंबर महिन्यात स्पर्धा हाेऊ शकली नाही. यासाठी परिषदेने शासनाकडे विनंती केली हाेती. याला आता शासनाने रीतसर परवानगी दिली आहे.
बैठकीत यजमानपद जाहीर : येत्या १७ जानेवारी राेजी कुस्तीगीर परिषदेची बैठक हाेणार आहे. याच बैठकीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वेळापत्रकासह यजमानपद भूषवणाऱ्या जिल्ह्याच्या नावाची घाेषणा करण्यात येईल. सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असे परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.