महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । फलटण । मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने देण्यात येणार्‍या सन 2022 च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा आज संस्थेच्यावतीने अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.

संस्थेच्यावतीने जाहीर करण्यात आलेले पुरस्कार याप्रमाणे – धाडसी महिला पत्रकार पुरस्कार – सौ.शीतल करदेकर (विशेष प्रतिनिधी, दै.वृत्तमानस, मुंबई), दर्पण पुरस्कार पश्‍चिम महाराष्ट्र विभाग – अनुराधा कदम (उपसंपादक, दै.तरुण भारत, कोल्हापूर), मराठवाडा विभाग – प्रल्हाद उमाटे (जिल्हा प्रतिनिधी, दै.मराठवाडा नेता, नांदेड), विदर्भ विभाग – प्रा.डॉ.राजेंद्र मुंढे (ज्येष्ठ पत्रकार, वर्धा), उत्तर महाराष्ट्र विभाग – जयप्रकाश पवार (निवासी संपादक, दै.दिव्य मराठी, जळगाव), कोकण विभाग – शैलेश पालकर (संपादक, महावृत्त डॉटकॉम, रायगड), सुरेश कौलगेकर (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, वेंगुर्ला), विशेष दर्पण पुरस्कार – किरण बोळे, (प्रतिनिधी, दै.सकाळ, फलटण), स.रा.मोहिते (प्रतिनिधी, दै.जनमत, फलटण).

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 176 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. कार्यक्रमास कोकण प्रादेशिक पर्यटन विकास समितीचे नूतन उपाध्यक्ष संदेश पारकर, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, पोंभुर्ले गावचे सरपंच सादिक डोंगरकर, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर, श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचे प्रमुख सतीश मदभावे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिनी 6 जानेवारी 2023 रोजी समारंभपूर्वक होणार असल्याचेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!