स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१८: महाराष्ट्राचा भारतीय संसदेतील इतिहास प्रेरणादायी आहे. सत्तेत असताना किंवा विरोधी पक्षात असताना विधायक काम करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा बाणा संसदेत वेगवेगळ्या रुपात पाहायला मिळतो म्हणूनच संसदेत गुणात्मकदृष्ट्या महाराष्ट्र अव्वल राहिला आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी आज मांडले.
‘संसदेतील महाराष्ट्र’ या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे २९वे पुष्प गुंफताना श्री. केसरी बोलत होते.
देशाचे पहिले विधी मंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र कन्या व देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपपंतप्रधानपद भूषविणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकसभेचे पहिले अध्यक्षपद भूषविणारे दादासाहेब मावळणकरांपासून पुढे या पदावर सरस कार्य करणारे महाराष्ट्राचे नेते, विरोधी पक्षनेते,कर्तबगार केंद्रीय मंत्री व उत्तमोत्तम संसदपटू देणाऱ्या महाराष्ट्राची संसदेतील कामगिरी अभिमानास्पद आहे. विधायक कार्य करण्याचा मराठी बाणा जपत महाराष्ट्रातील नेत्यांनी संसदेत गुणात्मकदृष्ट्या उत्तम काम करून राज्याला संसदेत अव्वल स्थान मिळवून दिले आहे,असे श्री केसरी म्हणाले.
स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राने संसदीय कार्यप्रणालीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात विधी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महत्त्वाचे मंत्री होते. ते राज्यसभेचे सदस्य होते.त्यांच्या रूपाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व संसदेत होते. सोबतच काकासाहेब गाडगीळ हेही महाराष्ट्राचे मंत्री देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात होते. देशावर आलेले संकट दूर करण्यात मराठी माणसं पुढे होती. चीनच्या भारत आक्रमणानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात बोलवून संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. श्री. चव्हाण यांनी १९६५ मध्ये पाकिस्तान विरुद्धचे युध्द जिंकून भारतीय सैन्यास आत्मबल दिले. त्यानंतर त्यांनी गृह, अर्थ, परराष्ट्र व्यवहार ही खाती समर्थपणे सांभाळली आणि उपपंतप्रधानपदाची जबाबदारीही पेलली असे श्री. केसरी यांनी सांगितले.
लोकसभेचे पहिले अध्यक्षपद गणेश वासुदेव उर्फ दादासाहेब मावळणकर या मराठी माणसाने भूषविले त्यांनी उत्तम प्रथा पंरपरा संसदेत स्थापित केल्या. शिवराज पाटील चाकुरकर लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी संसदेचे कामकाज दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहचविले. दूरचित्रवाणीद्वारे प्रश्नकाळ व महत्त्वाच्या चर्चा देशभर पोहोचविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी सभागृहाच्या कामाकाजाला वळण लावण्याचेही कार्य केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मध्य प्रदेशच्या असल्या तरी मूळ मराठी असलेल्या सुमित्रा महाजन यांची लोकसभा अध्यक्षपदाची कारकीर्दही उल्लेखनीय राहिल्याचे श्री. केसरी म्हणाले.
महाराष्ट्राच्या कर्तबगार मंत्र्यांचे ,खासदारांचे राष्ट्रीय स्तरावरील योगदान व संसदीय कामगिरी उल्लेखनीय आहे. लोकसभेचे नेते म्हणून सुशील कुमार शिंदे यांना मान मिळाला आहे तर यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. कामगार नेते कॉ.श्रीपाद अमृत डांगे, समाजवादी नेते एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे,बॅ.नाथ पै, मधू दंडवते,जॉर्ज फर्नांडिस, विठ्ठलराव गाडगीळ, प्रमोद महाजन, राम नाईक तसेच महाराष्ट्रातून निवडूण न आलेले पण अखेरपर्यंत मराठी बाणा जपणारे संसदपटू मधु लिमये, नानाजी देशमुख आदींनी संसदेत आपल्या कार्याचा ठसा उमटवून उत्तम कार्य केले. मृणाल गोरे, प्रमिला दंडवते सरोज खापर्डे जयवंतीबेन मेहता या महिला खासदारांनीही संसदेत चमकदार कामगिरी केल्याचे श्री. केसरी म्हणाले.
शंकराव चव्हाण यांनी गृहमंत्रीपदी केलेली कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या काळात पंजाबमध्ये शांततेत निवडणुका पार पडल्या. त्याचवेळी जम्मू-काश्मीर व आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर आणि सुशीलकुमार शिंदे यांनीही देशाच्या गृहमंत्रीपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. देशाचे अर्थमंत्री राहिलेले चिंतामणराव देशमुख यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे.यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांनीही अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. सलग दहा वर्ष कृषिमंत्री म्हणून कार्य करणारे शरद पवार यांची कामगिरीही दमदार राहिली आहे.मधु दंडवते, राम नाईक ,सुरेश प्रभु आणि विद्यमान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देशाच्या रेल्वे मंत्रीपदावर वेगळी छाप सोडली आहे. दिलेली जबाबदारी चोख व समर्थपणे पूर्ण करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा स्वभाव आहे म्हणूनच त्यांना केंद्रात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळाली व त्यांनी ती उत्तमरित्या निभावली, असे श्री. केसरी यांनी सांगितले. संसदेत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून जातात , लोकशाहीच्या या मंदिरात महाराष्ट्राचा केवळ संख्येनेच नाही तर कर्तृत्वाने व गुणात्मकदृष्ट्याही दबदबा आहे. महाराष्ट्राचा हा दबदबा सत्तेत दिसतो तसाच विरोधातही खुलतो म्हणूनच संसदेत महाराष्ट्र अव्वल राज्य ठरले आहे. राज्याचे हे स्थान भाविष्यातही कायम राहिल ,असा विश्वास श्री. केसरी यांनी यावेळी व्यक्त केला.