दैनिक स्थैर्य । दि. २५ मार्च २०२३ । पुणे । शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील आहे. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना ९४ हजार कोटींची मदत करण्यात आली. शंभर टक्के लसीकरण व सर्वाधिक मदत देणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.
राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री अब्दुल सत्तार होते.
पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, शेतीला पुरक असा जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसायाकडे पाहिले जाते. दूग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाला नवीन दिशा मिळावी, नव-नवीन तंत्रज्ञानाचा पशुधन व्यवसायाला फायदा झाला पाहिजे. यासाठी ‘महापशुधन एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे. शेळी-मेढी पालनाला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या महामंडळाचे राज्याचे मुख्यालय अहमदनगर असणार आहे. यासाठी वार्षिक दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा व्यवसाय करणाऱ्या तरूणांना १ लाख ७५ हजार रूपयांचे बिन व्याजी कर्ज दिले जाणार आहे.
पशुधनाच्या लसीच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पुण्यात ७० कोटी रूपये खर्चून प्रयोगशाळा उभारण्यात आली असून सप्टेंबर २०२३ पासून प्रत्यक्ष लसीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे. यामुळे महाराष्ट्र देशाला लस पुरविणार आहे. कृत्रीम कार्यक्रमात बदल करून ९५ टक्के मादी पशुधन निर्माण होतील यासाठी प्रयत्न आहेत. गायींच्या जतन, संवर्धनासाठी गो-सेवा आयोग विधेयक मांडण्यात आले आहे. असे पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे-पाटील पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यापुढे सर्वात मोठे आवाहन दूध भेसळीचे आहे. असे स्पष्ट करत श्री. विखे-पाटील म्हणाले, नवीन कायदा आणून दूध भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात येईल. यावर सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. असे आवाहन ही पशुसंवर्धनमंत्र्यांनी केले. सावळीविहिर येथील शेती महामंडळाच्या जागेवर नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात येईल. अशी घोषणा ही श्री. विखे-पाटील यांनी यावेळी केली.