जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी जर्मनीचे शिष्टमंडळ मुंबईत आले आहे. आज या शिष्टमंडळासह मुंबईत झालेल्या एका परिषदेत श्री. केसरकर बोलत होते. यावेळी जर्मनीच्या बाडेन वृटेमबर्गचे राज्यमंत्री डॉ.फ्लोरियन स्टॅगमन, लॉर्ड मेयर डॉ.फ्रँक मेंट्रप, स्टूटगार्ड चे महापौर थॉमस फुहरमन, जर्मनीचे महा वाणिज्य दूत अचिम फॅबिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबईचे जर्मनीतील विविध शहरांशी घनिष्ठ संबंध असून महाराष्ट्र जर्मनीशी हृदयाने जोडला गेलेला आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून व्यावसायिक आणि कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाने विविध व्यावसायिक तसेच कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी करार केलेले आहेत. शाळांमधून व्यवसाय आणि कौशल्य आधारित प्राथमिक शिक्षण दिले जाते. जर्मनीमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असून जर्मनीची आवश्यकता विचारात घेता व्यवस्थित नियोजन करून महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याबाबत परस्पर सामंजस्य करार करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पर्यावरण, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्यास वाव असून विशेषतः कोकणातील पर्यटन स्थळे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. जर्मनीतील पर्यटकांनी कोकणात यावे, असे आवाहन श्री.केसरकर यांनी यावेळी केले.

जर्मनीतील राज्यमंत्री डॉ. स्टॅगमन यांनी यावेळी बोलताना भारत विविध क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटी, कुशल मनुष्यबळ आदी क्षेत्रात आम्ही सहकार्य करू इच्छित आहोत, तर जर्मनीला सुमारे चार लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ती पूर्ण करू शकतो. या माध्यमातून परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!