दैनिक स्थैर्य । दि.०२ जानेवारी २०२२ । नवी दिल्ली । अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त शामलाल गोयल हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना निरोप देण्यात आला.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर निरोप सभारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारत सरकारच्या लोकपाल संस्थेचे सदस्य तथा महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव डी.के जैन, अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.
शामलाल गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 1985 च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे सनदी अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या विविध महत्वाच्या प्रशासकीय पदांवर 36 वर्ष जबाबदारी सांभाळली. मागील दीड वर्षापासून श्री. गोयल हे महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी, त्यांनी सदनाचे गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त म्हणूनही कार्यभार सांभाळला होता.
श्री. गोयल यांच्या सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त पदाचा कार्यभार अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांना सोपविण्यात आला आहे. या निरोप समारंभानंतर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित ‘सप्रेम नमस्कार विनंती विशेष’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.