स्थैर्य, पुणे, दि. १५: राज्यातील राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांविषयीचा निर्णय अद्याप झालेला नाही. लोकशाही आणि घटना यांनी राज्यपालांना दिलेले अधिकार आणि सोपवलेल्या जबाबदाऱ्या न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने आजवर पाहिला नव्हता. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला हे दुर्दैवी आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना केली.
विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना राज्यपालांकडून अडवणूक होते, असा अनुभव सांगत असत. आता ते पंतप्रधान असताना राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेकडे ते “बघ्या’प्रमाणे पाहतात हे चिंताजनक आहे, असेही पवार म्हणाले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. फक्त आसाममध्ये भाजप सत्तेत राहील, असा राजकीय अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पाच राज्यांतील निवडणुकींचे निकाल एक नवा ट्रेंड निर्माण करतील आणि हा ट्रेंड देशाला नवी दिशा देईल, असे पवार म्हणाले. दरम्यान, पश्चिम बंगामध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचेच सरकार येणार असल्याचा दावा देखील पवारांनी केला.