
दैनिक स्थैर्य । दि. ०९ एप्रिल २०२२ । फलटण । महाराष्ट्रात सत्ता बदलासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या मंडळींनी केवळ राजकीय हेतूने खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थनावर हल्ला घडवून आणून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. या प्रयत्नाच्याद्वारे त्यांना महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणून सत्ता बदलाची घाई झाल्याचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
खासदार शरदराव पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबई येथील निवासस्थानावर एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असून त्या प्राश्वभूमीवर काही एसटी कर्मचारी व अन्य लोकांना तसेच त्यांचे वकील ॲड. गुणवंत सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरु केली आहे. तथापि खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करीत फलटण बंद आणि प्रांताधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या “लक्ष्मी – विलास पॅलेस” या फलटण येथील निवासस्थानाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दिपकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ, माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे सातारा जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे, प्रा. भीमदेव बुरुंगले, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, सौ. लतिका अनपट, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सौ. राजश्री शिंदे, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, संजय गांधी निराधार व अनुदान योजना सभापती बापूराव गावडे, निंभोरेचे उपसरपंच मुकुंद रणवरे, माजी उपसभापती संजय सोडमिसे व त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्य यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश दोषी, शिरीष दोषी, नितीन गांधी आदी मान्यवरांच्यासह शहर व तालुक्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.
महाराष्ट्रात राजकीय हेतूने आंदोलनापेक्षा लोकांच्या प्रश्नांसाठी झालेली आंदोलने तुम्हा आम्हास सर्वांनाच ज्ञात आहेत. तथापि खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा हेतू एसटी कामगारांच्या प्रश्नापेक्षा राजकीय हेतूने झालेला असल्याचे एकूण परिस्थितीवरून स्पष्ट दिसते. वास्तविक खासदार शरद पवार यांनी आता पर्यंत गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय वाटचालीत कष्टकरी व श्रमिकांचीच बाजू घेतल्याचे अनेक उदाहरणे सर्वांच्या समोर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हि त्यांची भूमिका सौहार्दाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामगारांच्या विविध प्रश्नांच्या बाबत त्याच प्रमाणे ऊस तोड मजुरांच्या पासून अन्य कष्टकऱ्यांच्या बाबतीत त्यांना ज्ञाय देताना प्रसंगी शाशन अथवा संबंधित संस्थांच्या वर किती बोजा पडला या पेक्षा कष्टकऱ्यांना न्याय देण्याला प्राध्यान दिल्याचे दिसून आले आहे. आताच्या एसटी संपातही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समवेत अनेक बैठका घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला घडवून आणण्यात राजकीय हेतू स्पष्ट दिसून येत आहे. चौकशी नंतर हे सर्व निश्चित पणे समोर येईल असा विश्वास ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत गेल्या काही वर्षात देशात व राज्यात राजकारणाचा दर्जा खालावला आहे. प्रत्येक गोष्टीत जे काही वाईट घडलं आहे, ते पवार साहेबांनीच केले असल्याचा आरोप केला जात असला तरी त्यामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत बदलत्या राजकीय संघर्षात जशास तस उत्तर देणे गरजेचे आहे. ईडीच्या नावाखाली जे आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होत आहेत त्याला राजकरीय हेतूचाच वास आहे. केवळ महाराष्ट्रातच ईडी कार्यरत आहे. इतर राज्यात ईडी कार्यरतच नाही. त्यामुळे त्यामधील राजकीय हेतू स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत या घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतानाच खासदार शरद पवार यांच्या निवसस्थानावरील हल्ल्याच्या निषेधार्त फलटण बंद ठेवण्याची मागणी आमदार दिपकराव चव्हाण यांनी यावेळी केली.
राज्याची अस्मिता व लाखो नागरिकांचे देव असलेले खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर जो भ्याड हल्ला केला आहे. त्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत एसटी कर्मचाऱ्यांनी विदुषकाला आपला नेता केला आहे. त्यातून त्यांचे हित साधले जाणार का ? अशी शंका व्यक्त करीत वास्तविक खासदार शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत असताना एसटी कर्मचाऱ्यांना ज्याचा एसटी व एसटी कर्मचाऱ्यांशी काडीमात्र संबंध नाही त्याचे नेतृत्व स्वीकारण्यात काय लाभ झाला. भाजपाने पवार साहेबांच्या विकोधात बोलणाक्यांना पदे दिलेली आहे. त्यातून भाजपाची संस्कृती आता घसरली आहे. भाजपा पैसे पिकवत आहेत का ? भाजपाच्या कोणत्याही माणसाला ठोकायला आपण तयार आहे. निवडणूकीत हार व पराभव होत असतात. कालची उदयनराजेंची प्रतिक्रिया ही छत्रपतींना न शोभणारी असल्याचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी नमूद केले.
राज्यामध्ये कधीही न घडलेली घटना काल झाली. पवारसाहेबांच्या घरावर भ्याड हल्ला होत असेल अशी प्ररिस्थीती ह्या पुर्वी कधीही आली नव्हती. पवार साहेबांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कधीही विरोधी भूमिका घेतलेली नाही. प्रत्येकावर पवार साहेबांचे उपकार आहेत. पवार साहेब हे सकारात्मक राजकारण करत आलेले आहेत. कुणाच्या ही घरात घुसुन कुणालाही काहीही करता येवु शकते. घरादारावर येण्याची वृत्ती अशी परिस्थिती ह्या पुर्वी कधीही आली नव्हती. विकासाच्या दृष्टीने बाजुला घेचुन दिशाभूल करण्याचे काम सध्या देशात व राज्यामध्ये सुरू आहे. मराठा आरक्षणाबाबत सुध्दा दिशाभूल करण्याचे काम विकोधक करित आहेत. याचा सोक्ष मोक्ष आता लावण्याची गरज आहे. पवार साहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्र आहे, हे दाखवण्याची सुद्धा गरज आता आहे. हल्ल्याच्या निषेधासाठी आज फलटण बंद ठेवण्यात येणार आहे. श्रीमंत रामराजे व आमदार साहेबांनी स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील गावागावात मंदिरे व त्यांचे सभामंडप उभारले असून आम्हीही धर्म मानणारे धार्मिक वृत्तीला पाठिंबा देणारे आहोत तथापि केवळ मंदिरे बांधून लोकांचे समाधान होत नाही. त्यासाठी विकास प्रक्रिया अखंडित सुरु ठेवावी लागते. त्याकडे दुर्लक्ष करून धर्मभावनेचा डंका वाजवल्याने अंतिमतः लोकांचे नुकसानच होणार असल्याचे स्पष्ट करीत खासदार शरद पवार यांच्या विचाराने पुरोगामी महाराष्ट्र उभा राहिला असताना त्याला जाती भेदाचे वळण देणे राज्याच्या हिताचे नसल्याचे स्पष्ट करीत आगामी काळामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन लोकांना विकासाची दिशा कोणी स्वीकारली आणि राज्याच्या विकासाला कोण गती देण्यात यशस्वी झाले याची माहिती देण्याची आवश्यकता श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केली.
काही विषयाबाबतीत मतभेत असू शकतात तथापी त्यातून कोना नेत्याच्या घरावर हल्ले झाल्याचे गेल्या पन्नास वर्षांच्याहून अधिक काळ ऐकिवात नाही. संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीसारखा गंभीर विषय तत्कालीन नेते कार्यकर्त्यांनी अत्यंत शांततेने संयमाने हाताळला. त्याच पद्धतीने राज्यातील संघर्षाचे विषय शांतता व सयंमाने हाताळण्याची आवश्यकता आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व क्रांतिसिंह नाना पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याच पद्धतीने राज्यातील आताच्या प्रश्ना बाबत टोकाची भूमिका न घेता मतपेटीतून लोकांची मते आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न होण्याची आवश्यकता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
या बैठकीनंतर उपस्थित सर्व नेते कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून खासदार शरद पवार यांच्या निवसस्थानावरील हल्ल्याचा निषेध करीत मोर्चा काढला. आणि या घटनेचा निषेध करणारे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना देवून आमच्या भावना राज्यपाल महोदयांना विनंती त्यांना करण्यात आली. शांततेच्या मार्गाने निघालेला मोर्चा काढून निवेदन दिल्यानंतर विसर्जित करण्यात आला.