महाराष्ट्राच्या मुलींचा उत्तराखंडवर दणदणीत विजय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । फलटण । महाराष्ट्राच्या मुलींच्या संघासह विदर्भच्या मुलांनी आणि कोल्हापूरच्या मुले व मुलींच्या संघानी किशोर-किशोरी गटाच्या ३२वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेची विजयी सलामी दिली.

येथील घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात शनिवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या मुलींनी उत्तराखंडचा २०-१ असा एक डाव राखून धुव्वा उडविला. यात कर्णधार दिपाली कंक (२.४० मिनिटे नाबाद पळती व ३ गुण) व धनश्री तामखडे (४.२० मिनिटे संरक्षण व ३ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. स्वप्नाली तामखडे हिने आपल्या धारदार अक्रमणात ४ गडी टिपले.

दुसऱ्या सामन्यात राजू पाटीलच्या अष्टपैलू खेळीमुळे कोल्हापूरच्या मुलांनी केरळवर १७-११ अशी मात केली. राजूने चार गडी बाद करीत दोन मिनिटे संरक्षण केले. त्यांच्या मुलींनीही उत्तरप्रदेशवर १३-६ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला. अष्टपैलू कामगिरी करणारी चैत्राली वाडेकर ही त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली. चैत्रालीने पहिला डावात ४.३० मिनिटे व दुसऱ्या डावात दोन २.२०मिनिटे नाबाद पळती करत आक्रमणात चार गडी टिपले.

अन्य एका सामन्यात विदर्भाच्या मुलांनी हिमाचल प्रदेशचा १३-७ असा एक डावाने पराभव केला. विदर्भच्या कृष्णा तायडे (३.३० मिनिटे व १.१० मिनिटे नाबाद) व मोहित नेवारे यांची संरक्षणाची खेळी (२.००मिनिटे नाबाद व २.२० मिनिटे) संघास विजय मिळवून दिली.

अन्य निकाल : मुले : उत्तर प्रदेश वि.वि. दिल्ली २२-११ डावाने, हरियाणा वि.वि. तामिळनाडू १३-११ दोन मिनिटे १० सेकंद राखून, पश्चिम बंगाल वि.वि. गुजरात १९-१३ एक डावाने.

मुली : हरियाणा वि.वि. मध्य भारत १८-३ डावाने, गुजरात वि.वि. बिहार २४-० डावाने, दिल्ली वि.वि. हिमाचल प्रदेश १५-६ डावाने.


Back to top button
Don`t copy text!