दैनिक स्थैर्य | दि. 18 ऑक्टोबर 2024 | फलटण | महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर २५५ (अजा) फलटण विधानसभा मतदार संघ निवडणुकांसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा २५५ फलटण(अजा) विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महसूल, पोलिस विभागासह संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे, टेलिफोन भवन शेजारी, नगर परिषद नवीन सांस्कृतिक भवन येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी निदर्शनास आणून दिले, त्यावेळी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव, नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निखिल मोरे, फलटण शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नायब तहसीलदार संतोष देशमुख, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांच्यासह शहर व तालुक्यातील वृत्तपत्र व चॅनलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. २२ ते २९ दरम्यान स्वीकारणार उमेदवारी अर्ज
निवडणूक आयोगाने मंगळवार दि. १५ रोजी महाराष्ट्र विधानसभा पंचवार्षिक निवडणुकांची घोषणा केली असून त्यावेळी पासून राज्यभर निवडणूक आचार संहिता कार्यरत झाली असल्याने सर्वांनी त्यादृष्टीने योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करताना मंगळवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून मंगळवार दि. २२ ते मंगळवार दि. २९ ऑक्टोंबर दरम्यान सुट्टीचे दिवस वगळून दररोज सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. बुधवार दि. ३० ऑक्टोंबर रोजी सर्व दाखल अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६ मतदान
बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान करता येणार असून शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजले पासून संपेपर्यंत शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
एकूण ३५५ मतदान केंद्रांवर मतदान व्यवस्था
२५५ (अजा) फलटण विधानसभा मतदार संघात एकूण ३५५ मतदान केंद्र असून त्यापैकी ४७ शहरी भागात आणि ३०८ ग्रामीण भागात असल्याचे सांगताना यापैकी १७८ मतदान केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने तेथील सुरक्षीतता अधिक मजबुत होणार आहे, या मतदान केंद्रांवर मध्यवर्ती निवडणूक कार्यालय आणि पोलिस ठाण्यातून थेट लक्ष ठेवले जाणार असल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
३ लाख ३८ हजार ४६४ मतदार आणि ९४९ सैनिक, २१६० दिव्यांग मतदार
२५५ फलटण (अजा) विधानसभा मतदार संघात १ लाख ७२ हजार ४५९ पुरुष, १ लाख ६५ हजार ९९१ स्त्री, १४ तृतीय पंथी असे एकूण ३ लाख ३८ हजार ४६४ मतदार आहेत, तर ९४९ सैनिक, २१६० दिव्यांग मतदार असल्याचे सचिन ढोले यांनी सांगितले.
तरुण मतदार ७ हजार ६९० तर ८० वर्षांवरील १० हजार १९ मतदार
या मतदार संघात १८ ते १९ वयोगटातील ७ हजार ६९०, २० ते २९ वयोगटातील ६० हजार ७४५, ३० ते ३९ वयोगटातील ७० हजार १९६, ४० ते ४९ वयोगटातील ६८ हजार ५५९, ५० ते ५९ वयोगटातील ५८ हजार ९२१, ६० ते ६९ वयोगटातील ४० हजार ८११, ७० ते ७९ वयोगटातील २१ हजार ५२३ आणि ८० वर्षांवरील १० हजार १९ असे एकूण ३ लाख ३८ हजार ४६४ मतदार असल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी निदर्शनास आणून दिले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व शांततेत, निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी चोख व्यवस्था
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित, शांततेत, निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी ६ भरारी पथक, ९ स्थिर सर्वेक्षण पथक, ५ छायाचित्रण सर्वेक्षण पथक, २ छायाचित्रण पाहणी पथक नियुक्त करण्यात आल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
दिव्यांग व ८५ वर्षांवरील वृद्धांसाठी निवासी मतदान व्यवस्था
दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांसाठी त्यांनी फॉर्म नंबर १२ डी भरुन दिल्यानंतर खास पथकाद्वारे त्यांच्या निवासस्थानी खास व्यवस्था करुन मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगताना या मतदार संघात ८५ वर्षांवरील ४ हजार ८५२ आणि दिव्यांग मतदार २ हजार १६० असल्याचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.