फलटणमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा यशस्वी समारोप; “जनतेच्या सहकार्यामुळेच सेवेची संधी” – आमदार सचिन पाटील


फलटण येथील सजाई गार्डन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा (टप्पा क्र. १) यशस्वी समारोप आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी लाभार्थ्यांना जागेवरच विविध दाखले आणि कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. 10 एप्रिल : सामान्य जनतेची प्रलंबित शासकीय कामे एकाच छताखाली आणि जलद गतीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाला फलटण तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा (टप्पा क्र. १) यशस्वी समारोप फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

‘जनतेच्या सहकार्यामुळेच सेवेची संधी’:

या शिबिरात उपस्थित नागरिक आणि लाभार्थ्यांशी संवाद साधताना आमदार सचिन पाटील यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यातील जनतेने दिलेल्या भक्कम सहकार्यामुळे आणि प्रेमामुळेच मी आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. या माध्यमातून मला जनतेची सेवा करण्याचे मोठे भाग्य लाभत आहे. जनतेने दिलेल्या या आशीर्वादांमुळेच शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना मी थेट ‘आपल्या दारी’ आणू शकलो आहे.”

तसेच, तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि शासन दरबारी असलेली आपली अनेक वर्षांची प्रलंबित कामे या अभियानाच्या माध्यमातून त्वरित पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील जनतेच्या कामांसाठी सकारात्मक सहकार्य करावे, अशा कडक सूचनाही आमदार सचिन पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

लाभार्थ्यांना थेट जागेवरच लाभ:

या ‘महाराजस्व समाधान शिबिराचे’ प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागले नाहीत. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना जागेवरच अनुदान, आवश्यक शासकीय दाखले तसेच शेतीसाठी उपयुक्त कृषी अवजारांचे वाटप आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हातात दाखले आणि अवजारे मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान पाहायला मिळाले.

प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांची मोठी उपस्थिती:

या महत्त्वपूर्ण शिबिरासाठी प्रशासनाचा मोठा फौजफाटा आणि विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली भोसले, फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांसोबतच निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली घोरपडे, वन अधिकारी बोटकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. फाळके, भूमी अभिलेख उपअधीक्षक पिसे, दुय्यम निबंधक पठाण आणि तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी नागरिक या शिबिरात सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!