स्थैर्य, फलटण, दि. १० : कोरोनाच्या भिषण परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विशेषत: सर्वसामान्यांची अतोनात आर्थिक परवड होत आहे. अशा परिस्थितीत अनेक गोरगरीब कुटूंबांमध्ये मुलीचे लग्न ठरले आहे पण लग्नाचा खर्च कसा भागवायचा ? असा प्रश्न सतावत आहे. या कुटूंबांना मदतीचा हात म्हणून फलटण तालुक्यातील गोरगरीब मुलींच्या लग्नकार्यासाठी महाराजा मंगल कार्यालय पूर्णत: मोफत उपलब्ध केले असल्याची माहिती, श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांनी दिली आहे.
श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूह आपद् परिस्थितीत सामाजिक भान ठेवून लोकांच्या मदतकार्यात नेहमीच पुढाकार घेत असतो. त्याचाच भाग म्हणून गोरगरीब कुटूंबांसमोरील लग्नकार्याच्या खर्चाची अडचण लक्षात घेवून या संस्था समूहामार्फत महाराजा मंगल कार्यालय अशा कुटूंबांसाठी मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी गरजूंनी प्रशासनाचे लग्नकार्यासंबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन या ठिकाणी विवाह सोहळा पार पाडावा, असे सांगून अधिक माहिती व बुकींगसाठी 9423880240 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही दिलीपसिंह भोसले यांनी केले आहे.
दरम्यान, विवाह कार्यासंबंधींच्या आर्थिक प्रश्नाची भिषणता ओळखून, महाराजा मंगल कार्यालयामार्फत सहाय्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल दिलीपसिंह भोसले यांचे कौतुक होत आहे.