दैनिक स्थैर्य | दि. 25 सप्टेंबर 2024 | फलटण | ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्त्व, पहिल्या महायुद्धात उत्तम सर्जन म्हणून केलेल्या कामगिरीसाठी ‘मेरिटोरियस सर्व्हिस अवॉर्ड’ मिळवणारे फलटण नगरीचे भूषण प.पू.सद्गुरु डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराज यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथी निमित्त बुधवार (दि.२४ रोजी) त्यांच्या सुवर्ण पादुकांची महापूजा संपन्न झाली. दरम्यान, उपळेकर परिवारातर्फे रोहन उपळेकर यांच्या हस्ते सहस्र तुलसीअर्चन करण्यात आले.
पुणेस्थित कै.नरेंद्र साठे हे प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे भक्त आहेत. त्यांनी सुवर्ण पादुका तयार करून घेतल्या होत्या. पन्नासाव्या पुण्यतिथी निमित्त त्या पादुकांवर रुद्र, पुरुषसूक्त आदी वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक तसेच प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या आवडत्या सोनचाफा, कृष्णकमळ, गुलाब फुलांचे तसेच एक हजार तुळशीच्या पानांचे अर्चन करण्यात आले.
पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणांहून आलेल्या उपळेकर परिवारातील सदस्यांनी आणि फलटणमधील भक्तांनी या विशेष महापूजेचा आनंद घेतला. लवकरच प. पू. उपळेकर महाराजांच्या अप्रकाशित आठवणींचे पुस्तकही प्रसिद्ध होणार असल्याचे उपळेकर महाराजांचे पणतू रोहन उपळेकर यांनी सांगितले.