
स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑगस्ट : विविध शाळा आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून धर्मप्रचारावर ३०० व्याख्याने पूर्ण केल्याबद्दल महंत बाळकृष्ण शास्त्री महानुभाव यांचा आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महंत बाळकृष्ण शास्त्री यांचे धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांनी आपले कार्य असेच अखंडपणे चालू ठेवावे, अशा भावना आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.
महंत बाळकृष्ण शास्त्री यांनी आपले ज्ञान विविध व्याख्यानांद्वारे समाजापर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या सत्कार समारंभात आमदार सचिन पाटील यांनी त्यांना अभिनंदन पत्र आणि शाल देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक अनुप शहा, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आणि आमदार सचिन पाटील यांचे स्वीय सहाय्यक ज्योतीराम घनवट यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महंत शास्त्री यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.