दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२३ । पनवेल । महामानव विचार मंचाच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती महोत्सव पनवेल येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्नील यादव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वीर जिजामाता, पनवेल श्री, महाराष्ट्र श्री, दिव्यांग भारत श्री पुरस्कारांनी सन्मानित बॉडीबिल्डर कनकेश्वर (बंटी) पांडुरंग रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी प्रवीण रा. रसाळ यांनी प्रास्ताविक सादर करून, सूत्रसंचालनाची धुरा आपल्या हाती घेतली तसेच बौद्धाचार्य तुकाराम सावंत यांनी धार्मिक विधी सुमधुर आवाजात पार पाडला.
तद्नंतर संस्थेचे संचालक स्वप्नील यादव व जेष्ठ सभासद तुकाराम कांबळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलन केले, त्यांच्यासोबत आदरणीय शशिकला यादव, भगवान यादव, शिवाजी माने, मेघा जाधव, लिलाबाई रसाळ, विनोद कदम, मंगेश मोरे आदी मान्यवरांनी ही मेणबत्ती व उदबत्ती प्रज्वलन केले.
तद्नंतर संस्थेचे सदस्य विनोद कदम यांच्या राहत्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नवीन मूर्ती मोठ्या थाटामाटात वाजत गाजत आणून सदर मूर्तीची स्थापना किरण तांबे यांच्या शुभहस्ते महामानव विचार मंच व हरे कृष्ण को. ऑप. हौ. सोसा. यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात करण्यात आली.
सदर प्रसंगी महामानव विचार मंचाचे अध्यक्ष आदरणीय उत्तम कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म, जडणघडण, शिक्षण, वैचारिक लढा व क्रांती यावर आपले मौलिक विचार मांडले तसेच “महामानव विचार मंचाचे सदर जयंती महोत्सव साजरा करण्याचे प्रथम वर्ष असले तरी त्यानी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देशातील सर्वच महामानवांचे देशातील सर्व जनतेवर उपकार असल्याने त्याना एका विशिष्ट जातीमर्यादेत न बांधता सर्वांनी एकत्र येऊन त्यांची जयंती साजरी केली पाहिजे तेव्हाच जातीपातीच्या नावाने तरुणांच्या मनात विष पेरणाऱ्या मनुवादी व्यवस्थेचा कणा मोडून देशातील सर्वच महामानवांच्या विचारातील भारत घडेल” असे उद्गार कनकेश्वर (बंटी) पांडुरंग रसाळ यांनी त्यांच्या भाषणात काढले. त्यानंतर शरद रविढोने यांच्या नेतृत्वाखाली तसेच मिलिंद जाधव यांच्या देखरेखीत मोठ्या धुमधडाक्यात रॅली काढण्यात आली तसेच रुही मोरे, आयुष यादव आदी चिमुकल्या वक्त्यांनी भाषण व गीते सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यानंतर संस्थेतर्फे वडापाव वाटप करण्यात आले.
सरतेशेवटी प्रवीण रा. रसाळ यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या रागेश कदम, तुषार यादव, हरेश खैरे, प्रवीण कांबळे, संदेश पवार यांचे तसेच मोफत खुर्च्या व मंडप सामुग्री दिल्याबद्दल प्रवीण जुवेकर, साउंडसाठी सूरज कांबळे यांचे व धम्मदान करून जयंती कार्यक्रमास हातभार लावणाऱ्या सर्व दनवीरांचे आभार मानले व बौद्धाचार्य सुरेश साखरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात शेवटची गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.