दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । सातारा । इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळावी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ‘महाज्योती’तर्फे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी अचलपूर येथे केले.
विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या विद्यमाने फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल अचलपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण व संशोधन (महाज्योती) संस्थान नागपूरच्या वतीने अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यामध्ये विविध योजना राबविण्याबाबत, तसेच निवासी एकात्मिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत रविवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतीबा फुले प्रशिक्षण व संशोधन केंद्र, नागपूर ची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जाण्यासाठी तयार करणे तसेच त्यांना सर्व पूरक साहित्य उपलब्ध करून देणे आहे.
इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळावी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय, व्यवसाय व वस्तू विक्री मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, विज्ञान केंद्र, वस्तीगृह या सर्व बाबींचे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र आपल्या मतदार संघात उभे करण्याचा मानस राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी व्यक्त केला.
यावेळी अनिल भटकर विशेष कार्यकारी अधिकारी, रवींद्र वाणी सहाय्यक संचालक, अमरावती विभाग, निलेश देठे विशेष कार्यकारी अधिकारी, अनिल कोल्हे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, दिवाकर मोहने उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, आनंद काळे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, श्वेता रहांगडले, कुणाल शिरसाठे प्रोजेक्ट मॅनेजर, श्री भूषण कदम सर, पुणे, आ. सिस्टर लिनेट मुख्याध्यापिका फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल, अचलपूर, तसेच उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
राज्यमंत्र्यांचे स्वीय सहायक राहुल मोहोड यांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी शुभांगी श्रीराव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलचे सर्व कर्मचाऱ्यांनी योगदान केले.