दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । फलटण । जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जावली येथे कै. महादेव गलांडे सेवाभावी विकास मंडळाच्यावतीने जावली गावातील गरजू विद्यार्थ्यांना गेली १६ वर्षे दरवर्षी गणवेश व आवश्यक साहित्य वाटप करण्यात येते. याही वर्षी सालाबादप्रमाणे सदरचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राजे मल्हारराव होळकर वाचनालय व ग्रंथालय जावलीचे अध्यक्ष प्रा. शरदराव गलांडे व कै. महादेव गलांडे सेवाभावी विकास मंडळाच्या संचालिका सौ. नंदिनी शरद गंलाडे यांच्याहस्ते शुभहस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी प्राथमिक जिल्हा परिषद केंद्रशाळा जावली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेकळवाडा, जावली हायस्कूल, जावली तसेच जावली कार्यक्षेत्रातील पाच अंगणवाड्यामधील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा जावलीस एक मोठी सतरंजी भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्यावेळी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जावली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आडके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक शिवाजीराव मोरे यांनी तर आभार रामचंद्र बागल यांनी मानले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते काशिनाथ शेवते, जावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनियुक्त संचालक दिलीप शिंदे, कल्याण वाघमोडे, विलास बनकर, श्री. जगताप, जावली हायस्कूल जावली श्री. वाघमोडे, सौ. साळुंखे, जाधव आदीसंह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.