
दैनिक स्थैर्य । 19 जून 2025 । सातारा। शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ’महादरे तलाव’ भरला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आधी ’हत्ती तलाव’ भरला. त्याच्या प्रवाहामुळे महादरे तलावही ओसंडून वाहू लागला आहे.दर वर्षी एप्रिल व मे महिन्यात या भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो . शहराच्या व्यंकटपुरा पेठ, रामाचा गोट आणि चिमणपुरा पेठ या भागांना प्रामुख्याने पाणीपुरवठा करणारा महादरे तलाव आटल्याने या भागांतील पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली होती. ही तूट भरून काढण्यासाठी कास धरणातून अतिरिक्त पाणी उपसले जात होते, ज्यामुळे कास पाणीपुरवठा योजनेवर मोठा ताण येऊन पश्चिम सातार्यातील वितरण व्यवस्था कोलमडली होती. परिणामी, कास धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही पालिकेला पाणीकपात लागू करावी लागली होती.
मागील काही दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.या पावसामुळे प्रथम हत्ती तलाव पूर्ण क्षमतेने भरला आणि त्यातून वाहणारे पाणी महादरे तलावात येऊ लागले. सोमवारी पावसाचा जोर कायम असतानाच महादरे तलावही काठोकाठ भरून वाहू लागला. दोन्ही तलाव भरल्याने आणि कास धरणाची पाणीपातळीही समाधानकारकपणे वाढल्याने आता शहराला पाणीपुरवठा करणार्या मुख्य स्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सातारा पालिका पाणीकपात मागे घेण्याच्या तयारीत आहे.