स्थैर्य, सातारा, दि. २७ : सातारा शहराच्या पश्चिम भागास पाणीपुरवठा करणारा महादरे तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. याच परिसरातील हत्ती तलावही भरला आहे. त्यामुळे हा परिसर लक्ष वेधून घेऊ लागला आहे. दरम्यान, दोन्हीही तलाव भरल्याने शहराच्या पश्चिम भागास पाणीपुरवठा होणार्या काही भागाचा पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे.
सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागास पाणीपुरवठा करणारे कास धरण भरले. यवतेश्वर डोंगरमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी ओढ्यामार्गे प्रथम हत्ती तलावामध्ये येते. हा तलाव पूर्णपणे भरला आहे. हत्ती तलावामध्ये गढूळ पाण्याचे फिल्ट्रेशन होऊन ते पाणी स्वच्छ होते. स्वच्छ झालेले पाणी महादरे तलावामध्ये येते. आता ऐतिहासिक महादरे तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या साहाय्याने या तलावातून व्यंकटपुरा पेठेसह परिसरात पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी फक्त घरगुती वापरासाठीच पुरवले जाते. यवतेश्वर डोंगराच्या पायथ्याला असणारा महादरे तलाव ब्रिटिशकालीन असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. दोन्ही तलाव भरल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.