स्थैर्य, औंध, दि.४: तेराव्या शतकातील आद्य मराठी कथाकाव्यकार महदंबचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य अत्यंत मोलाचे आहे. ज्या काळात स्त्रीला कसल्याच स्वातंत्र्याची मुभा नव्हती, अशा काळात नारी समस्येला वाणी देण्याचे काम महदंबांनी आपल्या धवळ्यांच्या (लग्न समारंभात पतीसाठी गायलेली गीते) माध्यमातून केले. मराठीतील पहिली कथाकाव्यकर्ती म्हणून महदंबांचा आवर्जून उल्लेख केला जातो, असे प्रतिपादन जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. उदय जाधव यांनी केले.
खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात “महदंबांचे जीवनकार्य व सामाजिक योगदान’ या विषयावरील कार्यक्रमात डॉ. जाधव बोलत होते. मराठा सेवा संघप्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने “जागर साहित्याचा, नवदुर्गांच्या विचारांचा, कर्तृत्ववान स्त्रियांचा’ ही उद्घोषणा घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या विचारांचा कोरोना पार्श्वभूमीवर “ऑनलाइन’जागर करण्यात आला. याचा एक भाग म्हणून सातारा शाखेच्या वतीने महदंबा या महानुभाव संप्रदायातील आद्य कथाकाव्याकर्तीची निवड केली होती. “महदंबांचे धवळे एक संगीतमय दर्शन’ या विषयावर प्रथमच धवळ्यांचे गायन केले गेले.
डॉ. जाधव म्हणाले, “धवळे म्हणजेच लग्न समारंभात पतीसाठी गायलेली गीते होय. ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडू दिले जात नव्हते, अशा वेळी समाज परिवर्तनासाठी महादंबां यांचे कार्य लाखमोलाचे ठरते.” याबाबतचे विविध दाखले त्यांनी दिले. कोल्हापूर येथील संजय पवार यांच्या टीमने हे धवळे संगीतबद्ध सादरीकरणाचे कार्य उत्कृष्टरित्या पूर्ण केले. प्रा. डॉ. कोमल कुंदप व प्रा. डॉ. तेजस्विनी पाटील यांनी निवेदन केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. या वेळी सातारा जिल्ह्यातील नवनियुक्त कार्यकारिणीचा परिचय व स्वागत करण्यात आले. सातारा शाखेचे सचिव डॉ. अशोक तवर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सातारा शाखेच्या समन्वयक डॉ. प्रतिभा पाटणे यांनी आभार मानले.