दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । पाचगणी । मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यायासाठी आज सायंकाळी महाबळेश्वर येथे आगमन झाले. यावेळी मुसळधार पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाबळेश्वरकरांनी जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी व एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषनांनी छ. शिवाजी महाराज चौक परीसर दूमदुमला होता. अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी त्यांचे शहरात पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. शहरवासियांच्या वतीने तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी तर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
शिवसेनेतील 40 आमदारांचा गट घेवून एकनाथ शिंदे यांनी वेगळी चुल मांडुन भाजपा बरोबर संसार थाटला. भाजपा बरोबर युती करून त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आपल्या हाती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र असुन मुख्यमंत्री पदाची धुरा स्विकारल्यानंतर ते प्रथमच महाबळेश्वर दौरयावर आले होते. यावेळी ना. शंभुराज देसाई हे देखिल त्यांच्या सोबत होते. आपल्या दरे गावी जाण्यापुर्वी छ शिवाजी महाराज चौकात त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. सायंकाळी त्यांचे येथे आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांच्या समर्थकांनी घोषणांनी चौक दणाणुन सोडला होता. सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी जिल्हा परीषदेचे कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्हा पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल हे देखिल यावेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर पंचायत समितीचे माजी सभपती संजय गायकवाड, माजी नगरसेविका विमल आंबळे, विजय नायडु, सुभाष कारंडे आदी मान्यवरांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. महाबळेश्वर तालुका वारकरी संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत बावळेकर दत्तात्रय भिलारे यांनी देखिल त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी नागरीकांनी भर पावसात छ. शिवाजी महाराज चौकात गर्दी केली होती.
मुख्यमंत्री यांनी येथील भवनीमातेचे दर्शन घेवून या ठिकाणी असलेल्या छ शिवाजी महाराजांच्या पुतळयाला हार घालुन त्यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी लोकांच्या स्वागताचा स्विकार केला व नागरीकांना अभिवादन करून ते तापोळया कडे रवना झाले. तत्पुर्वी ना. शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतला व ते साताराकडे रवाना झाले.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच महाबळेश्वर तालुक्यातील 105 गावांच्या संघटनेने त्यांना आपला पाठींबा जाहीर केला होता. आज याच 105 गावातील एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी तापोळा येथे भुमिपुत्राच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. आज तापोळा येथे त्यांनी ग्रामस्थांच्या स्वागताचा स्विकार केला त्यांच्याशी संवाद साधुन ते आपल्या दरे गावाकडे रवाना झाले.
मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली असली तरी अनेक कट्ट्र शिवसैनिकांनी मुख्यमंत्री यांच्या या दौरया कडे दुर्लक्ष केले होते काही मोजकेेच शिवसैनिक या वेळी छ शिवाजी महाराज चौकात जमा झाले होते या बाबतही उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.