स्थैर्य, पांचगणी, दि. 12 :महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाळी हंगाम सुरू होत असून पावसाळी हंगामासाठी ही नगरी सज्ज होत आहे.
या पर्यटनस्थळी प्रतिवर्ष सुमारे 250 ते 300 इंच पाऊस पडतो म्हणूनच या गिरिस्थानाला महाराष्ट्राची चेरापुंजी असे संबोधतात. पावसाची संततधार, दाट धुके व पावसाळी गारठा हे येथील पावसाळी हंगामाचे खास वैशिष्ट्य असून या पावसाळी वातावरणापासून आपल्या इमारतींचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक महाबळेश्वरवासीयांना काहीना काही तरी काळजी घ्यावीच लागते. सध्या त्याच्याच गडबडीत महाबळेश्वरवासीय असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे. काही इमारतींना पारंपरिक गवताच्या झड्या (झडपा) लावून त्याचे संरक्षण केल्याचे दिसत आहे तर काही इमारतींना विविध रंगाचे प्लास्टिक कागद लावून त्या संरक्षित केल्याचे दिसून येते तर काहीना पत्राच्या झडपा लावल्या आहेत.
पावसाळी वातावरणापासून इमारतींचे संरक्षण करण्यासाठी गवताच्या पारंपरिक झड्या (झडपा) वापरण्याची येथील फार जुनी व खर्या अर्थाने पर्यावरणपूरक उपाययोजना आहे. आजपर्यंत तिच येथील बहुतेक ठिकाणी वापरात यायची. गवताच्या पारंपरिक झड्या (झडपा) अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बनविल्या जातात. या बनविताना कारवीच्या काठा यांचे दोन तट्टे व त्यामध्ये दोन प्रकारचे गवत वापरले जाते. झडीचे वरचे आवरण लांब लांब कोळंब जातीच्या नळीसारख्या गवतांचे बनविलेले असते. हे आवरण पावसाचे इमारतीच्या भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत वाहून नेते तर त्याच्या आतील आवरण हे वेड्यावाकड्या व छोट्या छोट्या गवताचे असते. यामुळे पावसाळी थंडीपासून भिंतींचे रक्षण केले जाते. गवताच्या या पारंपरिक झड्यांमुळे (झडपा) पावसाळ्यात धो धो पाऊस पडूनही इमारतीच्या भिंतीपर्यंत पाणी व थंडीही पोहोचू न शकल्याने भिंती सुकलेल्या व उबदार राहतात. यामुळे त्यांचे रक्षणही होते.
शासकीय व निमशासकीय इमारतींना आजही गवताच्या पारंपरिक झड्यां (झडपा) चा वापर होत असल्याचे दिसते तर अनेक जुन्या इमारतींना, बंगल्यांना पत्र्याच्या झडपा बघावयास मिळतात तर काही जुन्या व सर्व नव्या इमारतींना रंगेबेरंगी प्लास्टिक कागद संरक्षणासाठी वापरले जातात.