स्थैर्य, महाबळेश्वर, दि. १२ : नियम धाब्यावर बसवून पालिकेने भरमसाठ दरवाढ करून महाबळेश्वरकरांवर लादलेली घरपट्टीची दरवाढ मागे घेवून कोविड 19 च्या पाश्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये महाबळेश्वरकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाबळेश्वर पालिकेच्या नूतन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे केली.
नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर मंगळवेढा पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पालिकेचा पदभार स्वीकारला व कामकाजाला प्रारंभ केला. नूतन मुख्याधिकारी यांचे स्वागत करून, त्यांना शुभेच्छा देवून महाबळेश्वरकरांना भेडसावित असलेल्या काही प्रश्नांची सोडवणूक पालिकेने तातडीने करावी या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची भेट घेतली व शिवसेनेच्यावतीने काही मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हाप्रमुख व अर्बन बँकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे, जिल्हा महिला संघटक लीलाताई शिंदे, शहरप्रमुख राजेश गुजर, महिला शहर संघटक वनिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पालिकेत शिवसेना विरोधी बाकावर असली तरी चांगल्या कामाला शिवसेनेने नेहमीच सहकार्यच केले आहे, असे असले तरी शिवसेनेला गृहीत धरण्याची चूक कोणी करू नये. पालिकेने शासनाचे नियम धाब्यावर बसवून शेकडोपट घरपट्टीत वाढ केली आहे. पिण्याच्या पाण्याचे दर देखील महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे सर्वाधिक आहेत. येथे मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामात वाढ झाली आहे. अनेक वेळा अशा बांधकामाविरोधात तक्रार करूनही पालिकेच्या माजी मुख्याधिकार्यांनी दुर्लक्ष केले. यापुढे पालिकेने धनिकांच्या विनापरवाना बांधकामांना पाठीशी घालू नये, अशी मागणी राजेश कुंभारदरे यांनी केली.
शिवसेनेच्या शिष्टमंडळात प्रवीण कदम, राजेंद्र पंडित, गोविंद कदम, राजेश सोडकर, अनिल केळघणेे, नितीन परदेशी, उस्मान खारखंडे, किसन खामकर, राहुल शेलार, बंडू फळणे, शुभम कुंभारदरे, आकाश साळुंखे, अर्चना जाधव, राजश्री भिसे, उषा कोंढाळकर, सीमा सुतार व शिवसैनिक सहभागी झाले होते.