पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वरची बाजारपेठही फुलली

वेण्णालेकवर नौकाविहारासाठी रांगा


महाबळेश्वर – मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर बाजारपेठेत पर्यटकांची खरेदीसाठी झालेली गर्दी.

स्थैर्य, सातारा, दि.30 ऑक्टोबर : महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांच्या हक्काचे डेस्टिनेशन असलेले महाबळेश्वर बहरण्यास प्रारंभ झाला आहे. हंगामातील सुट्ट्यांमुळे पर्यटकांचे थंड हवेच्या पर्यटनस्थळी आगमन होत आहे. वेण्णालेक नौकाविहारसह प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर खुणावणारा हिरवागार निसर्ग, सूर्यास्त व सूर्योदयाचे विहंगम दृश्य व गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. वेण्णालेक परिसराला जत्रेचे स्वरूप आले असून, नौकाविहारास रांगा लागल्या आहेत.

गुलाबी थंडीचे अन् निसर्गाचे अद्वितीय लेणे लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ अशी महाबळेश्वरची ओळख आहे. दरवर्षी देशभरातून लाखो पर्यटक विविध हंगामात येथे भेटी देतात. दिवाळी हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेलसह दुकानदार सज्ज झाले आहेत. देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वाढली आहे. पर्यटक हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य पाहण्यात, अनुभवण्यात मश्गुल झाले असून, गुलाबी थंडीचा आनंद लुटला जात आहे. अधूनमधून होत असलेले ढगाळ वातावरण तर पावसाची काहीशी रिमझिम अनुभवायास पर्यटकांना मिळत आहे.

येथील पर्यटनास प्रसिद्ध असलेले निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, लॉडविक पॉईंट, सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉईंट, सूर्यास्तासाठीचा मुंबई पॉईंटसह लिंगमळा धबधब्यावरही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणार्या वेण्णा लेक येथे पालिकेच्यावतीने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विविध आकाराच्या आकर्षक बोटी दाखल झाल्या असून पर्यटकांसाठी नौकाविहाराचा आनंद द्विगुणित होणार आहे. नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागत असून थंड आल्हाददायक वातावरणात पर्यटक नौकाविहार करत आहेत. हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडेस्वारीचा आनंद लुटत आहेत. वेण्णालेकवर बच्चे कंपनीसाठी गेम्सची धूम सुरु असून जणू जत्रेचाच माहोल असल्याचे वातावरण आहे. तर खवय्यांसाठी स्ट्रॉबेरी पासून बनवलेली विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी या पदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत.

पर्यटकांच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. येथील मुख्य बाजारपेठेत पर्यटक हमखास खरेदीसाठी येत असतात. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम, जेली, थंडगार गोळा, प्रसिद्ध फज खरेदीसाठी गर्दी होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!