महाविकास आघाडीला सामान्यांशी देणेघेणे नाही, केवळ कमाई करण्यावर भर – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२४: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही. सत्ता किती काळ टिकेल याचा भरवसा वाटत नसल्याने सगळा भर कमाई करण्यावर आहे आणि राज्यात भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी मुंबईत केली.

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या राज्यव्यापी बैठकीसाठी विविध जिल्ह्यातून पक्षाचे पदाधिकारी ऑनलाईन जोडले गेले होते. मुंबईत व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ. आशिष शेलार, तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. भाजपाचे प्रदेश प्रभारी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी बंगलोर येथून बैठकीत सहभागी झाले होते. तसेच सहप्रभारी मा. ओमप्रकाश धुर्वे आणि मा. जयभानसिंह पवैय्या ऑनलाईन सहभागी झाले होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना त्यांचे सरकार किती टिकेल याची खात्री वाटत नाही, त्यामुळे ते वारंवार सरकार पाच वर्षे टिकेल म्हणून सांगतात. परंतु सत्ता उद्या जाईल तर आज कमाई करून घ्या, असे या आघाडीच्या नेत्यांचे धोरण आहे. त्यांना सामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही. आघाडी जनतेसाठी निर्णय करत नसल्याने मराठा आरक्षण गेले तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. महाविकास आघाडीचे नेते कोडगेपणाने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत. या आघाडीने भ्रष्टाचाराचे टोक गाठले आहे, तसेच खोटारडेपणाचेही टोक गाठले आहे.

त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वारंवार जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करून या सरकारवर अंकूश ठेवला आहे. भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावली आहे. भाजपाच्या दबावामुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. शेतकरी, वीज ग्राहक, मराठा समाज, ओबीसी, वंचित घटक अशा विविध घटकांसाठी भाजपाने आंदोलने केली आहेत. भाजपाने महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडले नसते तर त्यांना राज्यात स्वैराचार करण्यास खुले रान मिळाले असते.

ते म्हणाले की, सेवा हा भाजपाचा स्थायीभाव आहे. कोरोनाच्या महासाथीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अभिमानास्पद सेवाकार्य केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तज्ञांच्या सूचनेनुसार तयारी करावी.


Back to top button
Don`t copy text!