घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । मुंबई । राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना पक्के व स्वत:च्या मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन राज्यात 20 नोव्हेंबर 2020 पासून महाआवास अभियानाची सुरूवात केली. या पहिल्या टप्प्यात 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. सोबतच 50 हजार 112 भूमिहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका अर्थाने महाआवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला.

महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश पाहता दुसरा टप्पा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाला. यात 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. अन्य राज्याच्या तुलनेत हे महाआवास अभियान अधिक सक्षम आणि गतिमानतेने पुढे नेण्याचा निर्धार करत या पूर्ण अभियानात 7 डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण राज्यात प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजनेच्या 9 लाख 88 हजार 691 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून 7 लाख 43 हजार 326 घरे पूर्ण झाली आहेत. दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 1071 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे तर 4 हजार 684 घरे पूर्ण झाली आहेत.

राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा विविध योजनेमार्फत 4 लाख 19 हजार 833 घरांकरिता मंजुरी देण्यात आली असून दिनांक 7 डिसेंबर 2021 पर्यंत 2 लाख 95 हजार 941 घरे पुर्ण झाली आहेत. 20 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 या महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य पुरस्कृत आवास योजनेतील 1 हजार 902 घरे बांधण्यात आली आहे. उर्वरित घरे विहित मुदतीत पूर्णत्वाकडे जातील, असा विश्वास ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांनी व्यक्त केला आहे.


Back to top button
Don`t copy text!