
स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस असलेल्या सर्वपित्री अमावस्येनिमित्त, फलटणपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मीरगाव येथील श्री वेताळबाबा मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री ठीक ८ वाजता ही महाआरती होणार असल्याची माहिती श्री. हणमंतराव सरक (आण्णा महाराज) यांनी दिली आहे.
सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व विषद करताना श्री. हणमंतराव सरक यांनी सांगितले की, पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आपल्या पूर्वजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यूतिथी ज्ञात नाही किंवा काही कारणास्तव विशिष्ट तिथीला श्राद्ध करणे शक्य झाले नाही, ते सर्व जण या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून श्राद्ध करू शकतात. म्हणूनच याला ‘मोक्ष अमावस्या’ असेही म्हटले जाते.
ज्यांनी आपल्या पिढ्यांना घडवले, त्या पूर्वजांना वंदन करून आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी या महाआरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाआरती संपन्न झाल्यानंतर मंदिरात उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.