दैनिक स्थैर्य । दि. २५ जुन २०२१ । फलटण । शहर व तालुक्यात कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय साधने, सुविधा पुरेशी असूनही ऑक्सिजन पुरवठ्याबाबत चिंताक्रांत असलेल्या महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल संचलित लाईफ लाईन हॉस्पिटल प्रमुखांशी झालेल्या चर्चेनंतर आमच्याकडील ऑक्सिजन प्लँट हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करुन कोरोना रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचाराची सुविधा देण्यासाठी आम्ही आमचे कर्तव्य चोख बजावल्याचे मॅग्नेशिया केमिकल्सचे प्रमुख कर्नल श्रीमंत विनोद मारवाह यांनी स्पष्ट केले आहे.
ऑक्सिजन प्लँट स्थलांतरित केल्याने कंपनीचे उत्पादन बंद ठेवून होणाऱ्या लक्षावधी रुपयांचे नुकसानीपेक्षा गंभीर रुग्णांवरील उपचार महत्वाचे असल्याचे सांगत केलेल्या अभूतपूर्व मदतीबद्दल लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वतीने डॉ.संजय राऊत, डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ.सागर गांधी, डॉ.मेघना बर्वे यांनी मॅग्नेशियाचे प्रमुख कर्नल श्रीमंत विनोद मारवाह, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मॅनेजिंग डायरेक्टर संजय कुलकर्णी, अतुल भाटे, अविनाश लडगे, संचालक उमेश नाईक निंबाळकर, मिलिंद सुमंत, भारत पालकर व संबंधीत अधिकाऱ्यांचे त्यांना कृतज्ञता पत्र, श्रीराम, सीतामाता, लक्ष्मणाची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली.
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब महाराज यांनी रुग्णसेवेसाठी ह्याच हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही रुग्णांना अविरत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली होती, तीच प्रेरणा, भावना आणि त्यांचे आदर्श घेऊन महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल संचालित लाईफ लाईन हॉस्पिटल चालविताना आपण मोठी मेहनत घेऊन उत्तम उपचाराची संधी ग्रामीण भागात उपलब्ध करुन देत आहात त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, परंतू बदलत्या परिस्थितीत आपण उपलब्ध करुन दिलेली वैद्यकीय साधने, सुविधा पुरेशी नाहीत त्यामध्ये आणखी वाढ करा आणि पुना हॉस्पिटल इतके दर्जेदार, प्रशस्त, सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साधने सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल फलटणकरांना उपलब्ध करुन द्या अशी अपेक्षा व्यक्त करीत कर्नल विनोद मारवाह यांनी हॉस्पिटल प्रमुखांसह सर्वांना धन्यवाद दिले.
मॅग्नेशिया केमिकल्स मधील एक कर्मचाऱ्याने या कार्यक्रमातच आपण दुर्धर आजाराने ग्रस्त असताना लाईफ लाईन हॉस्पिटल व्यवस्थापन व तेथील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनतचं आपल्याला वाचवू शकल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.