मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे पहाटे दीर्घ आजाराने निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २१ : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज सकाळी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. लालजी टंडन यांचा मुलगा आशुतोषने टि्वटरवरुन ही माहिती दिली. आज सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आशुतोष टंडन यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ‘बाबूजी नही रहे’ अशा शब्दात त्यांनी टंडन यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

लालजी टंडन यांना मागच्या आठवडयात लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची फुप्फुस, किडनी आणि लिव्हर व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

श्वासोश्वास करण्यास त्रास होत असल्याने तसेच तापामुळे लालजी टंडन यांना सर्वप्रथम ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “लालजी टंडन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते तसेच त्यांचे डायलासिस सुरु होते” असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताना त्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले. मोदी म्हणाले, ‘श्रद्धेय लालजी टंडन यांना विनम्र श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो. टंडन यांनी समाजसेवेसाठी अमूल्य योगदान दिले. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मजबूत बनवण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते एक कुशल प्रशासक आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर होते.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!