स्थैर्य, सातारा, दि. ०२ : गेले 20 वर्षे रंगभूमीवर कार्यरत असणारी नाटक, एकांकिका व शॉर्टफिल्म मार्फत रसिक जणांचे मनोरंजन करणारी सातारची नाट्यसंस्था मधुमिता कला अकादमी या लॉकडाऊन मध्ये मधुमिता मुव्हीज या युट्युब चॅनेलमार्फत OTT Platform ला उतरत आहे. या चॅनेलची पहिलीच वेबसिरीज ‘हॉरर हाऊस’ प्रसारित झाली आहे. वेगवेगळ्या भयकथा म्हणजेच भयरसावर आधारित ही वेबसिरीज रसिकांना आवडत आहे. यातील पहिली कथा ‘अ बॉडी नं. 13’ ने रसिकांना भुरळ घातली आहे. लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या भुताखेतांच्या गोष्टी असा विषय असल्याने ही वेबसिरीज सर्व कुटुंबासोबत बघण्यासारखी आहे. सध्या बहुसंख्य वेबसिरीजमध्ये आढळणारी अश्लील दृश्ये, प्रेमप्रसंग, शिवीगाळ, भडक दृश्ये, चावट विनोद किंवा त्याच त्याच कथानकांना कंटाळला असाल तर ही वेगळ्या धाटणीची वेबसिरीज तुमचे नक्कीच मनोरंजन करेल यात शंका नाही. विशेष म्हणजे भूत विषय असला तरी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरणार नाही किंवा अनिष्ठ प्रथांचे समर्थन होणार नाही याची पूर्ण खबरदारी निर्माता, दिग्दर्शकांनी घेतली आहे. ही केवळ मनोरंजन या हेतूने पाहण्यासारखी वेबसिरिज आहे. पहिली कथा दोन एपिसोडची असेल पण त्यानंतर पुढील ‘झोका’ या कथेचे बरेच भाग असणार आहेत. याचे लेखन डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे. हॉरर हाऊसया वेबसिरिजच्या प्रोड्युसर शिल्पा अभिजित वाईकर आहेत. पहिली कथा अभिजित वाईकर यांनी तर दुसरी मधूमिता वाईकर हिने दिग्दर्शित केली आहे. कॅमेरा प्रशांत भंगुरे व संदेश बडवे , एडिटिंग व साउंड जमीर आतार, असिस्टंट प्रोडक्शन सचिन शिंदे, बलराम कलबुर्गी व आदित्य कुलकर्णी हे आहेत. पहिल्या कथेतील कलाकार आकाश धुमाळ, मधूमिता वाईकर, सोनल हेंद्रे – कुमठेकर, अक्षय बर्गे , विद्या विक्रम, शलाका लाहोटी, समीर काझी, सचिन शिंदे , माधव सोळसकर आणि अभिजित वाईकर हे भूमिका साकारताना दिसतील. संतोष भंडारे व सर्जेराव पाटील यांनी तांत्रिक सहकार्य केले आहे. डॉ. भाग्यश्री शिंदे, डॉ. विकास जाधव, डॉ. अभिजित देशपांडे, उदय गुजर व श्री व सौ काळभोर यांनी सहकार्य केले आहे. प्रेक्षकांकडून या वेबसिरीजचे स्वागत छान झाले आहे.