‘मधाचे गाव’ – ‘मधुमित्र’ उपक्रम संपुर्ण राज्यात राबविणार – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सभापती रवींद्र साठे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जानेवारी २०२३ । सातारा । देशातील पहिले मधाचे गाव- ‘मांघर’ या गावास महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच गावात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

याप्रसंगी बोलताना सभापती श्री. साठे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचा ‘मधाचे गाव’, ‘मधुमित्र’ हे अभिनव उपक्रम संपुर्ण देशात मार्गदर्शक ठरणारे उपक्रम असून राज्यातील प्रत्येक जिल्हयात हे उपक्रम राबविणार आहे. रोजगार निर्मीती व कुटीर उदयोगाला चालना देणे, निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करणे, मोठया प्रमाणावर मधमाशांच्या वसाहतींची निर्मीती करणे, परागीभवन सेवा पुरविणे आणि राज्याच्या मधोत्पादनात वृध्दी करुन महिला व तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मंडळ कटीबध्द असल्याचे सांगितले. संपुर्ण गाव मध व्यवसायाखाली आणण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमाचे श्री. साठे यांनी कौतुक केले व समाधान व्यक्त केले.

यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 4 नविन उदयोजकांना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील बँक स्तरावर मंजूरी मिळालेल्या 2 नविन उदयोजाकांना कर्ज मंजूरीचे पत्र वाटप करण्यात आले. 

मधाच्या गावात आळींबी लागवड, फळप्रक्रीया, मधापासून तयार होणारी उप-उत्पादने, चॉकलेट, कँडी, सरबत, आवळा सरबत, बेकरी उत्पादने, महिला सक्षमीकरण, प्रशिक्षण, पशुधन आरोग्य तपासणी, बी- ब्रीडींग, मसाला निर्मिती इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रमांचे मंडळामार्फत आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील, अर्थसल्लागार व मुख्य लेखाधिकारी, मुंबई विद्यासागर हिरमुखे, सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी,मुंबई एन. जी. पाटील, जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी, एन. एम. तांबोळी आदी उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ नागरीक जाधव गुरूजी, मधाचे गाव समितीचे अध्यक्ष महादेव जाधव यांनी  आपले मनोगत व्यक्त केले. संयुक्त वनवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी सुत्रसंचालन केले तर संजय जाधव यांनी आभार मानले. 


Back to top button
Don`t copy text!