स्थैर्य, मुंबई, दि९: मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टीका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी स्पष्टपणेच देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन राजकारण सांगितले.
एकनाथ खडसेंनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, मी या पदाच्या शर्यतीतही होतो. मात्र, माझ्यावर आरोप करुन मला बाजुला करण्यात आलं. पंकजा मुंडे या मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हटल्या, त्यांनाही पद्धतशीरपणे हटवलं गेलं. विनोद तावडेंच्या बाबतीतही तेच घडलं, असे म्हणत खडसेंनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच, वरिष्ठांकडे माझ्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मला व्हिलन करण्यात आलं. वरिष्ठ पातळीवरील माझेही काही सहकारी मित्र, नेतेमंडळी मला सांगतातच की, आणि हे कुणी केलं सर्वांना माहितीय, असे खडसेंनी म्हटले.
वरिष्ठांकडे देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याबद्दल जे काही वातावरण निर्माण केलं. मी भेटतो, मी बोलतो. मला वरिष्ठ नेते मंडळी सांगतात, ‘आपके बारे मे गलत सलत यहाँ रखा है’, म्हणजे माझ्याबाबतीत इतकं वाईट मत करुन ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही चांगली व्यक्ती आहे, हे आता वरचे लोकं विसरले आहेत, नाथाभाऊ म्हणजे व्हिलन, असे म्हणत खडसेंनी फडणवीस यांच्यावर थेट टीका केली.