दहिवडीत मंगळवारपासून माणदेशी साहित्य संमेलन

सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांची माहिती


स्थैर्य, सातारा, दि. 1 डिसेंबर : साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन, फलटण यांच्या वतीने दहिवडी (ता. माण) येथे दोन व तीन डिसेंबरला जिल्हास्तरीय माणदेशी युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संमेलन स्वागताध्यक्ष व साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी दिली.

या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ यांची निवड करण्यात आली आहे. ’माण तालुका साहित्यिक संवाद’ या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक एम. के. भोसले हे भूषविणार असून, यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव आवळे यांची प्रमुख उपस्थितीलाभणार आहे. दुपारच्या सत्रातील संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थान संमेलनाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ हे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, प्रकाश होळकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयवंत अवघडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. साहित्यिक महादेवराव गुंजवटे, सुनील काटकर, ताराचंद्र आवळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी शाहीर नारायण कदम यांचा पोवाडा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच यावेळी माण तालुका साहित्यिक दालन उद्घाटन व ’साहित्यिक सूची’चे प्रकाशनही होणारआहे. या सत्राचे संवादक युवा कवी सुयश आवळे हे असणार आहेत. तीन डिसेंबरला ’वाचन संस्कृती आणि आजचा युवक’ या परिसंवादाचे आयोजन जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नानासाहेब लांडगे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, शैक्षणिक समुपदेशक प्रमोद नलगे मार्गदर्शन करणार आहेत.

या वेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. निमंत्रितांचे कवी संमेलन ज्येष्ठ कवी तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी ज्येष्ठ कवी प्रदीप कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून, तर ज्येष्ठ कवी विलास पिसाळ, ज्येष्ठ साहित्यिकविलास वरे, ज्येष्ठ कवयित्री क्रांती पाटील यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. संमेलनाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक शिवलिंग मेनकुदळे हे भूषविणार आहेत. यावेळी ज्येष्ठ विचारवंत रवींद्र येवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य बबनराव खाडे, डॉ. अनिल दडस, स्वराज अ‍ॅकॅडमी दहिवडीचे कँप कमांडर अनिल काटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी साहित्यप्रेमी अस्लम शेख हे संवादक राहणार आहेत. यावेळी राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. तरी या साहित्य संमेलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.


Back to top button
Don`t copy text!