स्थैर्य, फलटण, दि.८: फलटण तालुका जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी, डॉ. कृष्णचंद्र भोईटे श्रमिक प्रतिष्ठानचे मॅनेजिंग ट्रस्टी आणि कामगार नेते मानसिंगराव तथा एम.पी.भगत यांचे अल्पशा आजाराने उपचार सुरु असताना आज (रविवारी) वयाच्या 82 व्यावर्षी निधन झाले.
श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असताना सन 1978 मध्ये एम.पी.भगत व ए.ए.शेख या दोघांना कामगार प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळात काम करण्याची संधी तत्कालीन आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्यामुळे प्राप्त झाली होती.
कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शिवसंदेशकार स्व. हरिभाऊ निंबाळकर, स्व. दादा नलवडे, स्व. मधुकर भिसे वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली सन 1967 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या फलटण तालुका जनरल कामगार युनियनचे स्थापनेपासून जनरल सेक्रेटरी असलेल्या एम.पी.भगत यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार संघर्ष व कामगार चळवळीसाठी दिले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. प्रामुख्याने हमाल, मापाडी यांच्यासाठी त्याचप्रमाणे शहरातील कामगारांसाठी त्यांनी सतत संघर्ष केला.
कामगारांच्या प्रश्नांची जाण आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी पूर्ण वेळ देवून त्याला न्याय देण्यासाठी अहोरात्र धडपडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असे वयाच्या 82 व्यावर्षीही शरीर साथ देत नसले तरी ते एकही दिवस घरात बसून राहिले नाहीत. सतत कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यात त्यांनी उभे आयुष्य खर्ची घातले. कामगारांना माथाडी बोर्डाच्या माध्यातून न्याय मिळवून देण्यासाठीही त्यांनी मोठा संघर्ष केला.
कामगार नेते एम.पी.भगत यांच्या निधनाने कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कामगार चळवळीला तेवढी गती देवून प्रश्नांसाठी संघर्ष करणारा एम.पी.भगत यांच्यासारखा तळमळीचा नेता पुन्हा होणे नाही. अशा भावना व्यक्त करीत कामगार चळवळीतील अनेकांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.