बारामतीच्या लावणीसम्राटाला ‘लॉटरी’; मिळाली थेट दोन चित्रपटांत काम करण्याची संधी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,बारामती,दि १२: ‘आता वाजले की बारा..’ या लावणीवर रिक्षा व्यावसायिक बाबाजी कांबळे यांनी केलेले नृत्य ‘सुपरडुपर’ हिट झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या नृत्याला लाखोंच्या संख्येने ‘लाईक’ मिळाल्या. बारामतीमध्ये एकाच दिवसात आपल्या लावणी नृत्याने लोकप्रिय झालेल्या रिक्षा व्यावसायिक बाबाजी कांबळे यांना आता थेट चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे संधी मिळणार आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक घनश्याम येडे यांनी त्यांना ही संधी दिली आहे.

मित्रांच्या आग्रहास्तव रिक्षा थांब्यावरच बाबाजी कांबळे यांनी काही दिवसांपुर्वी लावणी नृत्य केले.मित्रांनीच त्यांच्या लावणी नृत्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर सोशल मीडियावर या व्हिडीओने लोकप्रियतेचा कळस गाठला. अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी देखील कांबळे यांच्या नृत्याचे कौतुक केले होते.

त्यामुळे आपल्या कलेद्वारे राज्यातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या बारामती तालुक्यातील गुनवडी गावच्या बाबजी कांबळे यांना आता मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे. ‘चल रे फौजी’ आणि ‘कवच’ या आगामी दोन चित्रपटांमध्ये बाबजी कांबळे हे अभिनय करणार आहेत. आज चित्रपट-दिग्दर्शक घनशाम येडे यांनी बारामतीत येऊन बाबजी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटाची ऑफर दिली आहे.

‘अलख निरंजन’, ‘एलिजाबेथ एकादशी’ अशा काही चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक असलेल्या घनश्याम येडे यांनी कांबळे यांना फोन करत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार येडे हे बारामतीत आले. त्यांनी पुष्पगुच्छ कांबळे यांना देत त्यांच्या कलेचे कौतुक केले. त्यानंतर कांबळे यांना थेट आपल्या आगामी दोन चित्रपटात भूमिका देण्याची इच्छा व्यक्त केली. अचानक मिळालेल्या या संधीने कांबळे हे कमालीचे भारावले आहेत.


Back to top button
Don`t copy text!