दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२१ । फलटण । घटस्थापनेपासून अर्थात आज दि. ०७ ऑक्टोबरपासून फलटणचे आराध्य दैवत असलेले श्रीराम मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियमावली तयार करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे जिल्ह्यासह राज्यातील मंदिरे बंद होती. राज्य शासनाच्या नियमानुसार आजपासुन राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. फलटणकरांचे आराध्य दैवत असलेले प्रभु श्रीराम मंदिर सुध्दा भाविकांसाठी खुले करण्यात आलेले आहेत. मंदिर परिसरामध्ये जर गर्दी झाली तर सुरक्षित अंतर पाळण्यासाठी चौकोन आखलेले आहेत तर गाभार्यामध्ये गर्दी होवू नये म्हणून दर्शन रांग तयार करण्यात आलेली आहे.
फलटणकरांना ज्याच्या दर्शनाची आस लागली होती त्या प्रभू श्रीरामाचे दर्शन भाविकांना आज घेता आले. आज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून मंदिर उघडण्यात आली आहेत. आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती.