दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२३ | फलटण |
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश देणारे भगवान महावीर यांचा जयंती महोत्सव फलटण शहरातील जैन बांधवांनी मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करून त्यांना अभिवादन केले.
भगवान महावीर यांनी ‘अहिंसा परमो धर्म’ हा संदेश संपूर्ण जगाला दिला. तसेच संपूर्ण आयुष्यभर अहिंसा, सत्य, आचार्य व ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच व्रतांचे पालन केले. भगवान महावीर यांनी दिलेली अहिंसेची शिकवण ही सर्व जगाला सुख, शांती देणारी असून अहिंसेमुळे आपला व सर्व मानवजातीचा उद्धार होऊन अहिंसा हाच मानव जातीचा खरा धर्म व कर्म मानले जाते.
भगवान महावीर यांच्या २६२१ व्या जयंतीनिमित्त सर्व जैन धर्मियांनी भगवान महावीरांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक करून सकाळी भगवान महावीरांच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात, झांजपथक, लेझीम पथक व भव्य देखाव्यांसह वाजत-गाजत फलटण शहराच्या प्रमुख चौकांमधून काढली होती. यावेळी फलटण शहरातील भगवान महावीर स्तंभाजवळ सर्व जैन धर्मीय बांधव, भगिनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन भगवान महावीर स्तंभाला अभिवादन केले. जैन बंधू – भगिनी, तरुण वर्गाने मोठ्या उत्साहात भगवान महावीर जयंती कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन लाभ घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भगवान महावीरच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जैन सोशल ग्रुप फलटण यांच्या वतीने व फलटण ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६५ जैन बांधवांनी रक्तदान केले. तसेच जैन सोशल ग्रुपच्या वतीने पिंपरद येथील श्री संत ज्ञानेश्वर गोपालन संस्थेतील गोशाळेला चारा वाटप करण्यात आले व फलटण शहरातील बेवारस जनावरांना चारा देण्यात आला.