फलटण शहरांमध्ये भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । फलटण । संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, “जगा आणि जगू द्या” असा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरातील जैन बांधवांनी भगवान महावीर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

शहरातील दिगंबर जैन समाज बंधू – भगिनी आणि तरुण वर्गाने एकत्र येऊन सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन भगवान महावीर पालखीसह शोभायात्रा काढली होती, मिरवणूक नगर परिषद कार्यालय नजिक मुख्य चौकातील भगवान महावीर स्तंभाजवळ पोहोचल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तेथील भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर पालखी व शोभायात्रा मंदिराकडे मार्गस्थ झाली.

त्यानंतर जैन बंधू – भगिनींनी मंदिरात जाऊन दर्शन, अभिषेक केले. कोरोनामुळे गेले २ वर्षे पालखी, मिरवणूक, दर्शन वगैरे बंद असल्याने आता २ वर्षानंतर कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथील होताच जैन बंधू – भगिनी, तरुण वर्गाने मोठ्या उत्साहात महावीर जयंती कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन लाभ घेतला.


Back to top button
Don`t copy text!