भगवान बुद्धाचा धम्म वास्तववादी व विज्ञानवादी आहे : विजयकुमार जगताप


दैनिक स्थैर्य | दि. 21 जुलै 2025 । फलटण । जगात अनेक धर्म आहेत. त्या त्या धर्मामध्ये कर्म सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे. मात्र या सर्व धर्मापेक्षा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत वेगळा आहे. तो वास्तववादी व विज्ञानवादी आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुका शाखेचे संघटक विजयकुमार जगताप यांनी केले. ते भारतीय बौध्द महासभे मार्फत आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेत सरडे याठिकाणी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, माणूस जसे कर्म करतो तसेच त्याचेच फळ त्याला मिळते. तेव्हा सर्वांनी कुशल कर्म करावे. सर्वांप्रती मंगलभावना व्यक्त करावी.भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदायी वातावरणा मध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले. मौजे सरडे या गावात राजगृह समता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आणि बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये धम्म उपदेश देण्यात आला.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी व केंद्रीय असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले हे उपस्थित होते. तसेच फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष संपत भोसले,प्रचार आणि पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर कार्य.सचिव चंद्रकांत मोहिते तसेच भारतीय बौद्ध महासभे प्रवचनकार सोमिनाथ घोरपडे हे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. फलटण तालुक्यात जोरदार वर्षावास प्रवचन मालिका चालू आहे.

यावेळी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी वर्षावास म्हणजे काय ? तो केव्हापासून सुरु झाला. या काळातील उपासक व उपासिका यांनी कसे आचरण करावे. त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत का साजरा केला जातो याविषयी मांडणी केली.

यावेळी सर्व उपस्थितांना भारतीय बौध्द महासभा फलटण तालुक्याच्या वतीने संविधान प्रस्ताविका प्रत देण्यात आल्या. तत्पूर्वी सर्वांकडून प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्यातील उपासक उपासिका यांच्या सभासद नोंदणी कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!