ताथवडा घाटात लुटमार करणारी टोळी जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मानेवाडी (ता. फलटण) बस स्टॉपवर ग्राहकाला कुरियर पार्सल देण्यासाठी थांबलेल्या युवकाला सहाजणांनी मारहाण करून लुटून ताथवडा घाटात पसार झालेल्या या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी २४ तासांच्या आत पकडून जेरबंद केले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, १६ ऑटोबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कुरियर सप्लाय करणारा ऋषिकेश अनिल मिसाळ (वय १९, रा. कोळकी, ता. फलटण) हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानेवाडी (ता. फलटण) येथे कुरियर पार्सल देण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत पुसेगाव-फलटण रस्त्यावरील मानेवाडी बसस्टॉपवर थांबला असताना फलटणहून दोन मोटारसायकलींवरून आलेल्या सहाजणांनी ग्राहक असल्याचा बहाणा करून ‘पार्सल आहे का?’ असे विचारत ऋषिकेश मिसाळ याला गाडीवरून खाली पाडल्यानंतर दुसर्‍याने त्यांच्या डोयात दगड मारून जखमी केले. तसेच इतर चौघांनी लाथाबुयांनी मारहाण करून त्याच्याकडील रोख १० हजार रूपये, १५ हजार रूपयांचा मोबाईल व विविध पार्सल असलेल्या एकूण २७ हजार रूपयांच्या वस्तू असा एकूण ५२ हजार रूपयांच्या मुद्देमालाची बॅग जबरदस्तीने घेऊन ताथवडा घाटाकडे ते पळून गेले होते. या घटनेचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी पुसेगाव रस्त्यावरील सर्व हॉटेल, पेट्रोलपंप व इतर दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यानंतर अधिक तपास करत या लुटमारीतील आरोपी अजय संभाजी मदने (वय २१, रा. डिस्कळ, ता. खटाव), अक्षय संभाजी जाधव (वय २७, रा. मोळ, ता. खटाव), निखिल उमाजी बुधावले (वय २१, रा. बुधावलेवाडी, ता. खटाव), आदित्य रामदास शिरतोडे (वय १९, रा. ललगुण, ता. खटाव), आकाश प्रभाकर जाधव (वय २२, रा. कोरेगाव, ता. कोरेगाव) यांना मोळ (ता. खटाव) येथील डोंगराच्या पायथ्याखालून व नेर (ता. खटाव) येथील धरणाच्या भराव्याजवळून पाठलाग करून २४ तासांच्या आत ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोटारसायकलींसह एकूण २,४४,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. २१ ऑटोबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

वरील गुन्हेगार हे ताथवडा घाटात छोट्या-मोठ्या चोर्‍या सतत करत होते. या आरोपींपैकी अजय संभाजी मदने व निखिल उमाजी बुधावले यांनी १३ ऑटोबर २०२३ रोजी वाखरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोलपंपावरील कामगाराला तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रकम चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनिरीक्षक सागर अरडगे, पो. उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, पो. उपनिरीक्षक पाटील, पोलीस अंमलदार योगेश रणपिसे, नितीन चतुरे, अमोल जगदाळे व सहकार्‍यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!