दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२१ । कराड । पक्षांचा पिंजरा घेण्यासाठी आलेल्या महिलेसह तिच्या सोबत असलेल्या मुलींनी दुकानदाराने ठेवलेल्या पैशाच्या बॅगवर डल्ला मारून त्यातील रोख 80 हजार रूपये लंपास केल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली आहे. याबाबतची फिर्याद अल्ताफहुसेन युसुफ मुतवल्ली (वय 52, रा. गुरूवार पेठ, कराड) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुतवल्ली यांचे गुरूवार पेठ येथे कोयना दूध शॉपी नावाचे दुकान आहे. ते सदर दुकानामध्ये दुग्धजन्य पदार्थ व पाळीव पक्षांचे पिंजरे विकतात. मागील चार दिवसापूर्वी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी तीन दिवसापासून साठलेल्या पैशाचा भरणा करण्यासाठी 3 लाख 40 हजार रूपये एकत्र करून एका बॅगेत दुकानात ठेवले होते. त्यावेळी दुकानात पिंजरा घेण्यासाठी एक महिला व तिच्यासोबत तीन मुली आल्या. त्या महिलेने पाळीव पक्षांचा पिंजरा मागितला. त्यावेळी मुतवल्ली पिंजरा आणणेसाठी दुकानात गेले व पिंजरा घेऊन त्या महिलेला दाखविला. त्या महिलेने पिंजरा आवडला नाही म्हणून पिंजरा नको म्हणून दुकानातून गेल्या. त्यावेळी मुतवल्ली पैशाची ठेवलेली बॅग बँकेत भरणा करण्यासाठी निघाले असता त्यांच्या लक्षात आले की बॅगेत पैसे कमी आहेत म्हणून त्यांनी बॅगेतील पैसे मोजून पाहिले असता बॅगेतील रोख 80 हजार रूपये चोरीला गेले होते. त्यांनी बाहेर असणारे सीसीटीव्ही चेक केले असता समजले की पिंजरा घेण्यासाठी आलेल्या महिलेसोबत असलेल्या मुलीने बॅगेतील रोख रक्कम चोरी करून गेल्या आहेत. याबाबत मुतवल्ली यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी महिलेसह मुलींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.