दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । लोणंद । लोणंद नगरीमध्ये नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी आयोजित महिलांच्या बाइक रॅलीस लोणंद मधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महिला सक्षमीकरण आणि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” चा संदेश दिला.
मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला असते याच पाश्र्वभूमीवर लोणंद येथील इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शिल्पाताई पवार तसेच लोणंद येथील प्राजक्ता घोडके, डॉ.स्वाती पवार, डॉ.सरिता वर्धमाने, शैलजा खरात,कांचन घोडके, सुचेता हाडंबर आदी महिलांनी ” महिला सक्षमीकरण आणि बेटी बचाओ , बेटी पढाओ” हा संदेश देण्यासाठी महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीत पारंपारिक महाराष्ट्रीयन साडी आणि भगव्या रंगाचे फेटे परिधान करून लोणंद आणि परिसरातील जवळपास शंभर महिलांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” असे फलक घेतलेल्या दुचाकीवरून काढलेल्या शोभायात्रेला लोणंद नगरपंचायत पटांगणापासून सुरुवात करून ती पुढे शास्त्री चौक, शिवाजी चौक, बाजार तळ, गांधी चौक, तानाजी चौक मार्गे लक्ष्मी रोड वरून पून्हा नगरपंचायत पटांगणात समाप्त करण्यात आली.
या बाइक रॅलीनंतर लोणंद येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती शहा तसेच इनरव्हील अध्यक्षा शिल्पाताई पवार , डाॅ. मनीषा काकडे, सुचेता हाडंबर, डाॅ. संजीवनी येळे, माजी नगरसेविका शैलजा खरात यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण केले.
यावेळी नवीन वर्षानिमित्त संदेश देताना डॉक्टर स्वाती शहा यांनी महिला सबलीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले तसेच बेटी वाचवण्यासाठी बेटीला आधी शिक्षित करून स्वतःच्या पायावर उभं करून आत्मनिर्भर बनवलं पाहिजे असे सांगत सर्वांना नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.