
दैनिक स्थैर्य | दि. १४ फेब्रुवारी २०२५ | लोणंद |
लोणंद पोलिसांनी चारचाकी गाडीचे डिस्क व टायर चोरून टमटममध्ये भरून घेऊन चाललेल्या एकास रंगेहाथ पकडून अटक केली आहे. त्याच्याकडून पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास लोणंदच्या शास्त्री चौकात पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी रोहित ओमप्रकाश विश्वकर्मा (वय २३, रा. लोणंद, ता. खंडाळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले व त्यांचे सहकारी रात्रगस्त घालत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथील शास्त्री चौकात एक संशयित टमटमच्या (एमएच ११ सीएच ४६२८) पाठीमागील हौद्यामध्ये नवीन टायर भरून जाताना दिसला. पोलिसांनी पाठलाग करून टमटम थांबवली व चालक रोहित विश्वकर्मा यास गाडीमध्ये असलेले टायर याबाबत माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या ताब्यातील टमटममध्ये दोन लाख ३० हजार रुपये किमतीचे डिस्क असलेल्या टायर व ४२ हजार रुपये किमतीचे टायर असा चोरी केलेला पावणेतीन लाखांचा मुद्देमाल मिळून आला.