दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२३ । मुंबई । मी जाहीर सभा घेणार नाहीय. उन्हाळ्याच मुंबईच्या बाजुला एक घटना घडली. महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी धर्माचा आधार घेत सभा घेतली. हे मोठे लोक थंडगार वाऱ्यात होते, पण जनता उन्हात होती. त्यात १४-१५ लोक गेले. मी तेवढा वाईट नाहीय. आपल्याला सभा घ्यायचीय पण आता पाऊस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नागपुरात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी आणि फडणवीसांवर टीका केली. पाठीत वार केल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय. काय परिस्थिती आहे. फडणवीस उपमुख्यमंत्री पण त्यांच्यावर काय बोलायचे. त्यांची हालत अशी विचित्र झालीय की सहनही होत नाहीय. काय झालेय असे विचारले तर काही नाही काही नाही असे सांगतात. पण झालेय काहीतरी नक्की. मी पुन्हा येईन असे बोललो होतो. मी एकटा नाही आलोय, दोघांना घेऊन आलोय असे फडणवीस म्हणाले होते. मी त्यांची एक क्लिप दाखवतो असे सांगत नाही नाही नाही… एकवेळ लग्न करणार नाही… या भाषणांच्या क्लिप दाखविल्या. यानंतर फडणवीस यांना नागपुरला लागलेला कलंक आहे, असे ते म्हणाले.
२०१४ ते १९ तुमच्यासोबत सत्तेत होतो, त्यावेळा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून निरोप आले नव्हते का? पण जे करायचे ते उघड करायचे. २०१४ साली असे काय घडले होते, की तुम्ही युती तोडली? मला आजही आठवतेय. मातोश्री गजबजलेली होती. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास एकनाथ खडसेंचा फोन आला, आपले काही जुळेल असे वाटत नाहीय. आमच्या लोकांची इच्छा आहे की शिवसेनेबरोबर राहू नये. आम्ही ठरवलेय, असे खडसे म्हणाले होते. तेव्हा युती का तोडली, असा सवाल फडणवीसांना केला.
पाठीत वार करण्याची तुमची औलाद होती. युती आम्ही नाही तोडली. हिंदुत्वाच्या पायवर कुऱ्हाड ही भाजपाने तेव्हा मारली होती. मी टोमणा मारत नाही, तळमळीने बोलतोय. नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. संघाला १०० वर्षे होतील. भाजपा जे करतेय हे आरएसएसला मान्य आहे का? आरएसएस आणि भाजपाचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी खस्ता खाल्ल्या, काहींनी तर लग्न केले नाही. एकीकडे ते आणि ही लोकं, एवढी कशी काय बदलू शकतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. याचबरोबर उद्धव ठाकरेंनी संघाच्या काही लोकांचे कौतुकही केले.
हे कोणाचे ओझे तुम्ही वाहताय, एवढ्यासाठी आरएसएसने काम केलेय का, अविवाहीत राहिले का? जिथे भाजपा शून्य होती तिथे आता पुन्हा शून्य होणार आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहात, त्यांच्या कुटुंबाची निंदा करायची आणि वाट लावायची, पुढे त्याच लोकांना भाजपा सोबत घेत मंत्रिपद द्यायचे. इतर पक्षांतले गद्दार घेतलेत पक्ष वाढवताय, पण ही गद्दारी हिंदुत्वाशी आहे. ज्याच्या विरोधात मी लढलो त्याला भाजपात घेत आहेत, असे आता कार्यकर्ते म्हणत आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रातली २०१४ ला युती तोडली, १९ ला विश्वासघात केला. आता भगव्याशी गद्दारी केलीय. ही गद्दारी प्रभू रामाशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी आहे. बाळासाहेबांचा फोटो लावला की बाळासाहेब सोबत आले असे नाही, ते तर समोर बसलेत. महाराष्ट्रात मोदींचे नाणे चालत नाही, तसेच कर्नाटकात झाले. त्यांना हनुमानाचे नाव घ्यावे लागले. बाबरीवेळी एकमेव बाळासाहेब ठाकरे होते, राम मंदिर, अमरनाथ यात्रा यावर बोलणारे कोण होते, असा सवाल ठाकरे यांनी केला. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणारी पार्टी चार दिवसांत एकदम सरप्ट झाली. आता ही भ्रष्टाचारी माणसे मांडीला मांडी लावून बसलेली, ज्यांच्यासमोर तुम्ही बोलला त्या कार्यकर्त्यांनी आता करायचे काय? असा खोचक सवाल ठाकरेंनी केला. आता भाजपाचे भ्रष्ट जनता पार्टी असे नाव करावे, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.