पानिपत युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे लोकसभा अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश – डॉ. नीलम गोऱ्हे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ एप्रिल २०२२ । नवी दिल्ली । पानिपतच्या ऐतिहासिक युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकाचा विकास करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याबाबत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी लोकसभा भवनात दिले असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

पानिपत युद्ध स्मारक, त्याचबरोबर पानिपत येथील मराठा स्मारकाच्या विकासाबरोबरच  महाराष्ट्रातील लेण्याद्री, एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात करावयाच्या सोयी-सुविधा बाबत पुरातत्व खात्याने तात्काळ कार्यवाही करण्याविषयी त्यांनी निर्देश दिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. विधान मंडळाच्या सदस्यांना रेल्वे प्रवास करीत असताना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळाव्यात याबाबतही लोकसभा अध्यक्षांना डॉ. गोऱ्हे यांनी निवेदन दिले.

लोकसभा अध्यक्षांनी यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मंत्रालयाशी संवाद साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अध्यक्ष महोदयांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले.

या बैठकीला महाराष्ट्राच्या विधी व  न्याय विभागाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, महेंद्र काज, रवींद्र खेबुडकर, राजेश तार्वी, अनिल महाजन, मकरंद पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!